वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकी काँग्रेसच्या सेनेट या वरिष्ठ सभागृहाने रिपब्लिकन पक्षाच्या अर्थसंकल्पीय आराखड्याला मंजुरी दिली. त्यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१७मध्ये आणलेल्या लक्षावधी कोटी डॉलरची करकपात आणि सरकार खर्चामध्ये कपात लागू होईल. यासाठी शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेली चर्चा शनिवारी पहाटेपर्यंत चालली. त्यानंतर ५१ विरुद्ध ४८ मतांनी त्याला मंजुरी मिळाली. नवीन तरतुदींमुळे आरोग्यावरील खर्चात कपात केली जाईल अशी भीती डेमोक्रॅटिक पक्षाने व्यक्त केली आहे.
सेनेटमध्ये झालेल्या कामकाजादरम्यान अमेरिकेच्या एका महत्त्वाच्या नियमामध्ये बदल करण्यात आला. या नियमानुसार बहुतांश महत्त्वाच्या विधेयकांच्या मंजुरीसाठी सेनेटच्या किमान ६० सदस्यांची मंजुरी आवश्यक असे. मात्र, नवीन तरतुदीनुसार या नियमाला बगल देण्यात आली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या करकपात, सीमा सुरक्षा आणि लष्करी प्राधान्यासंबंधींची विधेयके मंजूर होण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतांची गरज आता उरणार नाही.
मंदीच्या अंदाजात वाढ
जे पी मॉर्गन या जागतिक वित्तीय सेवा कंपनीने जागतिक मंदीच्या अंदाजामध्ये वाढ केली आहे. यापूर्वी जे पी मॉर्गनने जागतिक मंदीची शक्यता ४० टक्के असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यात दुरुस्ती करून आता ही शक्यता ६० टक्के असल्याचे सांगितले.