हौशी अंतराळनिरीक्षक आता सौरमालेतील ग्रह व त्यांच्या उपग्रहांचा शोध वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतील; अवघी १९९ पौंड इतकी रक्कम खर्च करून ते स्वत:चे अंतराळयान अवकाशात पाठवून माहिती मिळवू शकतील. एका ब्रिटिश कंपनीने चंद्रावर अनेक छोटी याने पाठवण्याची योजना आखली असून त्यातील एखादे अंतराळयान हौशी खगोलनिरीक्षक अवघे १९९ पौंड खर्च करून विकत घेऊ शकतात; एक प्रकारे ते हे यान पुरस्कृत करू शकतात. किंबहुना मालकीही त्यांचीच असेल.
‘पॉकेट स्पेसक्राफ्ट’ या कंपनीच्या वतीने पाठवली जाणारी ही अंतराळयाने सीडीच्या आकाराची व कागदाइतकी पातळ असणार आहेत. जून २०१५ मध्ये ती पृथ्वीवरून सोडली जाणार असून जून २०१६ मध्ये चंद्रावर पोहोचतील. हौशी अंतराळ संशोधक हे यान पुरस्कृत करून त्यावर स्वत:ची छबी झळकवू शकतील, शिवाय वेब ब्राउजरच्या मदतीने विशिष्ट संदेशही पाठवतील. लोक हे पॉकेट स्पेसक्राफ्ट प्रयोगशाळेत तयार होताना ऑनलाइन पाहू शकतील. त्यानंतर क्युबसॅट या मातृयानाच्या मदतीने ही छोटी याने सोडली जातील. मातृयान एखाद्या व्यावसायिक प्रक्षेपकाच्या मदतीने चंद्राच्या दिशेने सोडले जाईल. तत्पूर्वी त्यातील काही याने पृथ्वीच्या वातावरणात सोडून ती परत जमिनीवर उतरण्याची चाचणी घेण्यात येईल. नंतर ही पॉकेट स्पेसक्राफ्ट म्हणजे छोटी याने चंद्राच्या दिशेने सोडली गेल्यानंतर त्यांची छायाचित्रेही घेतली जातील.पॉकेट मिशन कंट्रोल अ‍ॅपच्या मदतीने या यानाचा मागोवा त्याचे मालक घेऊ शकतील. या अंतराळयानाने पाठवलेली माहिती पहिल्यांदा अंतराळातून भूकेंद्र प्रणालीकडे येईल व नंतर थेट मालकाच्या स्मार्टफोनवर दिसू लागेल. वापरकर्ते त्यांचा मोबाईल फोन आकाशाच्या दिशेने धरून ते नेमके कुठे आहे हे जाणून घेऊ शकतील. पॉकेट स्पेसक्राफ्ट ही ब्रिस्टॉल येथील कंपनी असून त्यामुळे कमी खर्चाच्या व वापरून फेकून देण्याच्या अंतराळयानांचा एक नवा जमाना सुरू होणार आहे.पॉकेट स्पेसक्राफ्ट कंपनीचे संस्थापक मायकेल जॉनसन यांनी द टाइम्सला सांगितले की,  अंतराळ संशोधनात किती वजन अवकाशात नेले जाते यावर खर्च अवलंबून असतो. आमची अंतराळयाने लहान व हलकी असल्याने त्यांना पाठवण्यासाठी अगदी कमी खर्च येतो हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. सौरमालेत इतर ठिकाणीही अशी शोधयाने पाठवण्याचा कंपनीचा इरादा आहे. जर अशी एक हजार छोटी याने मंगळावर पाठवली तर तेथील पृष्ठभागाचा वेध घेता येईल. समजा, त्यातील एखादे यान अपयशी ठरले तरी काळजी करण्याचे कारण नाही, इतर अनेक याने असल्याने मोहिमेच्या यशावर काही परिणाम होणार नाही.

* पॉकेट स्पेसक्राफ्ट कंपनीचा उपक्रम
* अत्यंत हलकी व लहान अंतराळयाने चंद्र किंवा इतर ग्रहांवर पाठवता येणार
* अंतराळयानाची खासगी मालकी हे वैशिष्टय़.
* कमी खर्चात संशोधन शक्य

Story img Loader