पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आज सगळ्या खासदारांनी संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगॉलचा उल्लेख करत पंडित नेहरु यांचा स्पर्श त्या सेंगॉलला झाला आहे असं म्हटलं. नव्या लोकसभेतून पहिलं संबोधन करत असताना त्यांनी पंडित नेहरु, देशाची ७५ वर्षांची परंपरा यावर आपलं भाषण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेव्हा सेंगॉलची पूजा करण्यात आली आणि तो सेंगॉल लोकसभेत काचेच्या पेटीत ठेवण्यात आला तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आज लोकसभेतल्या भाषणात त्यांनी या घटनेचा उल्लेख केला नाही. उलट पंडित नेहरुंच्या हस्तस्पर्शाने पावन झालेला सेंगॉल आपल्याला मार्गदर्शक ठरेल असं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मोदी ?
आज नव्या संसदेत जमलेल्या सगळ्या खासदारांचं आणि सगळ्या जनतेचं अभिनंदन करतो आहे. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मला अध्यक्षांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असं म्हणत मोदींनी भाषण सुरु केलं. नव्या संसद भवनात मी सगळ्या खासदारांचं स्वागत करतो. आजचा हा क्षण अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचा हा उषःकाल आहे. भारत नवे संकल्प घेऊन नव्या वास्तूत आला आहे. एका नव्या विश्वासाने आपण आपला प्रवास सुरु केला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण जेव्हा नव्या संकल्पांची नांदी झाली आहे. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाचा पाया घातला होता. त्याचा आवर्जून उल्लेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. नवं संसद भवन हे आपल्या प्राचीन लोकशाहीचं प्रतीक आहे. आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे. गणपती विवेक आणि बुद्धिची देवता आहे. या दिवशी ही सुरुवात होणं शुभ आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सेंगॉलविषयी काय म्हणाले मोदी?
आपण जेव्हा नव्या संसदेत आलो आहोत आणि नवी सुरुवात करत आहोत तेव्हा आपल्याला भूतकाळातल्या सगळ्या वाईटसाईट गोष्टी विसरायच्या आहेत. आज आपल्या या भवनात सगळ्या गोष्टी नव्या आहेत. अशातच एक महत्त्वाची परंपरा असलेली गोष्ट आहे. ती गोष्ट नवी नाही ती जुनीच आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या किरणाचा साक्षीदार असलेली ती गोष्ट आहे ती आज आपल्यात आहे. ती गोष्ट दुसरी तिसरी काहीही नसून संसदेत असलेला सेंगॉल आहे. आपल्या समृद्ध इतिहासाला जोडणारा हा सेंगॉल आहे.
संसदीय लोकशाहीचा गृहप्रवेश होत असताना स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेला हा सेंगॉल आहे जो येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहणार आहे. या सेंगॉलला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांचा स्पर्श झालेला आहे. पंडित नेहरुंच्या हातात हा सेंगॉल पूजाविधी करुन देण्यात आला होता. त्यामुळे या सेंगॉलला अनन्यसाधारण महत्व आहे. देशाला जोडण्याचं काम या सेंगॉलने केलं आहे. देशाच्या एकतेचं ते प्रतीक आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. पंडित नेहरुंच्या हाती असलेला सेंगॉल आपल्यासाठी प्रेरणा देणारा आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.