पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत परदेश दौऱ्यासाठी गेलेल्या तिथल्या काही ज्येष्ठ पत्रकारांनी हॉटेलमधले चांदीचे चमचे चोरले असून ही लाजीरवाणी गोष्ट सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. हॉटेलमधले चमचे चोरल्याप्रकरणी हॉटेलनं या पत्रकारांकडून ५० पौंडचा दंड आकारला असल्याचं समजत आहे.
‘आऊटलुक’नं दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ पत्रकारांचा एक चमू ममता बॅनर्जी यांच्यासोबत लंडन दौऱ्यावर गेला होता. ममता बॅनर्जीसह सगळ्यांच्याच राहण्याची व्यवस्था लंडनमधल्या अलिशान हॉटेलमध्ये करण्यात आली होती. रात्री भोजनाचा कार्यक्रम होता. यावेळी ममता यांच्यासोबत असलेले ज्येष्ठ पत्रकारदेखील उपस्थित होते. पण, सहभोजन सुरू असताना त्यातल्या एका ज्येष्ठ संपादकानं मेजवरचे चांदीचे चमचे आपल्या बॅगेत भरले. संपादकांच्या कृतीचं अनुकरण करत इतरही ज्येष्ठ संपादकांनी आणि पत्रकारांनी चांदीचे चमचे आणि इतर वस्तू आपल्या बॅगमध्ये भरल्या. डायनिंग हॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही चोरी कैद झाली.
चोरी करणारे संपादक ममता बॅनर्जी सारख्या अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांसोबत असल्यानं हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा गाजावाजा न करता ते तिथेच मिटवण्याचा प्रयत्न केला. हॉटेलकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे समजताच इतर पत्रकारांनी चोरी केलेले चमचे कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले. पण, सुरूवातीला ज्या ज्येष्ठ पत्रकारानं चमचे चोरले त्यांनी मात्र आपली चुक कबुल करायला नकार दिला. त्यामुळे सीसीटीव्हीमधील पुरावे दाखवून मगच या संपादकांवर कारवाई करण्यात आल्याचं आऊटलुकनं म्हटलं आहे.
चोरी करताना पकडण्यात आलेले हे ज्येष्ठ संपादक पश्चिम बंगालमधल्या एका प्रसिद्ध लेखकाचे पुत्र असल्याचं समजत आहेत. वडिलांची पुण्याई पत्रकारितेत त्यांना चांगलीच कामी आली, या ओळखीवर पश्चिम बंगालमधल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी त्यांनी जवळीक वाढवली. एवढ्या मोठ्या पदावर असूनही हे संपादक महाशय अनेकदा चोरी करतात असे काही पत्रकरांनी आउटलुकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.