दिल्लीच्या प्रभारी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारमधील संघर्ष विकोपाला गेला असताना सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी नजीब जंग यांनी आपली अधिकार मर्यादा ओलांडली असल्याचे मत नोंदविले. सरकार आणि राज्यपाल यांच्यामधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी धवन यांच्याकडे त्यांचे मत विचारले होते. त्याला उत्तर देताना त्यांनी हे मत मांडले.
धवन यांनी तीन पानी कायदेशीर सल्ला राज्य सरकारकडे सोपविला आहे. त्यामध्ये धवन यांनी म्हटले आहे की, नायब राज्यपालांनी नाहक हा संघर्ष निर्माण केला. त्यांनी आपली अधिकार मर्यादा ओलांडली असून, त्यामुळे संसदीय लोकशाहीतील या दोन्ही सत्ताकेंद्रांच्या संबंधांवर परिणाम झाला. आपल्याला योग्य वाटेल असा मुख्य सचिव निवडण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार असतो. मात्र, केवळ ४० तासांत मुख्य सचिवांची नियुक्ती केली नाही. म्हणून आपल्याला हवा तो मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांवर लादण्याचा नायब राज्यपालांचा प्रयत्न समर्थनीय नाही. लवकरात लवकर मुख्य सचिव नेमला पाहिजे, अशी सूचना ते मुख्यमंत्र्यांकडे करू शकले असते, असेही धवन यांनी म्हटले आहे.
धवन यांच्या सल्ल्यानंतर केजरीवाल सरकार याप्रकरणात न्यायालयाचा दरवाजाही ठोठावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नजीब जंग यांनी अधिकार मर्यादा ओलांडली – सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे मत
सरकार आणि राज्यपाल यांच्यामधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी धवन यांच्याकडे त्यांचे मत विचारले होते.
First published on: 19-05-2015 at 01:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior sc lawyer says l g najeeb jung overstepped authority