भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा मंडळात परस्परांची भेट घेऊन चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जनता दल (युनायटेड) गटाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी फारकत घेतल्यानंतर प्रथमच या दोन ज्येष्ठ नेत्यांची झालेली भेट सर्वाच्या भुवया उंचावणारी ठरली.
राष्ट्रीय जनता दलाने अडवाणी व नितीशकुमार यांच्या भेटीचे वर्णन ‘मॅच फिक्सिंग’ असे केले तर ही सदिच्छा भेट असल्याचे सांगून जनता दलाने त्यावर रंगसफेती करण्याचा प्रयत्न केला. अडवाणी हे नितीशकुमार यांचे राजकीय गुरु असून ते त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाहीत. या दोन पक्षांचे एकमेकांपासून दूर होणे म्हणजे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी केलेले नाटक आहे, असा टोमणा राष्ट्रीय जनता दलाचे सरचिटणीस रामकृपाल यादव यांनी मारला.
जनता दलाचे (युनायटेड) बिहार अध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंग यांनी अडवाणी यांच्यासमवेत आपल्या नेत्यांची झालेली भेट ही सदिच्छा भेट असून अशा भेटींमुळे लोकशाही बळकट होण्यास मदतच होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.