भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची संवेदनशील माहिती लीक झाल्याचे उघड झाले आहे. फ्रान्समधील डीसीएनएस या पाणुबड्यांची बांधणी करणाऱ्या कंपनीची तब्बल २२,००० पानांची कागदपत्रे लीक झाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या कागदपत्रांमध्ये भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलच्या गुप्त माहितीचा समावेश असल्याचे समजत आहे. या वृत्ताला संबंधित यंत्रणांक़डून अद्यापही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी माहिती हॅक झाल्याची शक्यता व्यक्त करत नौदलप्रमुखांना याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, डीसीएनएस या कंपनीला नुकतेच ऑस्ट्रेलियासाठी १२ पाणबुड्यांच्या डिझायनिंगचे कंत्राट मिळाले होते. यामध्ये पाणबुड्यांचे सेन्सर्स, युद्ध व्यवस्थापन यंत्रणा, पाणतीर (टॉर्पेडो) प्रक्षेपण प्रणाली आणि पाणबुडीतील संपर्क व दिशादर्शन प्रणालीचा समावेश होता.
स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दल गोपनीय माहिती हॅक झाली असल्याचा संरक्षणमंत्र्यांचा संशय
भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन प्रकारातील पहिली पाणबुडी असणाऱ्या कलावरीची मे २०१६ मध्ये समुद्रात चाचणी घेण्यात आली असून ही पाणबुडी लवकरच नौदलात दाखल होणार आहे. याशिवाय, आगामी २० वर्षांत अशाच सहा स्कॉर्पिअन पाणबुड्या नौदलात दाखल होणार आहेत. लीक झालेल्या माहितीमध्ये पाणबुड्यांमधील युद्ध यंत्रणेचा तपशील असण्याची शक्यता आहे. याशिवाय, पाण्याखालून प्रवास करताना पाणबुड्यांच्या होणाऱ्या आवाजाचाही तपशील यामध्ये आहे. त्यामुळे शत्रूंना भारतीय पाणबुड्यांचा सहजपणे शोध लागण्याचा धोका आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन पाणबुड्यांच्या डिझायनिंगबद्दल कोणतीही तांत्रिक माहिती उघड झालेली नाही. तसेच भारतीय पाणबुड्यांची संवेदनशील माहिती भारतातूनच उघड झाल्याचा दावा, डीसीएनएस कंपनीने केला आहे. ऑस्ट्रेलियन व्यवस्थेत अनियंत्रित तांत्रिक माहिती असण्याची शक्यता नाही. डीसीएनएसकडे असलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी बहुस्तरीय आणि स्वतंत्र व्यवस्था अस्तित्त्वात आहे. याशिवाय, या माहितीची देवाणघेवाणही सांकेतिक भाषेत होते. त्यामुळे डीसीएनएसने दिलेल्या डिझायनिंगप्रमाणे काम करणाऱ्या भारतातील स्थानिक कंपनीतून ही माहिती उघड झाल्याची शक्यता आहे. डीसीएनएसची जबाबदारी फक्त माहितीची सुरक्षित देवाणघेवाण करण्यापर्यंत आहे. या माहितीचे नियंत्रण करणे आमचे काम नाही, असा दावा डीसीएनएसकडून करण्यात आला आहे.


स्कॉर्पिअन पाणबुड्या नौदलासाठी इतक्या महत्त्वाच्या का?