गुजरातमधील पाटण जिल्ह्य़ात दलित आणि उच्चवर्गीयांसाठी जातीवर आधारित स्वतंत्र अंगणवाडय़ा असल्याची बाब समोर आली आहे. पाटण जिल्ह्य़ातील हाजीपूर जिल्ह्य़ात १५९ आणि १६० क्रमांकाच्या अंगणवाडय़ा आहेत. या दोन अंगणवाडय़ांमध्ये केवळ एक संख्येचाच फरक असला तरी त्यामागील विभागणी चिंताजनक आहे.तीन महिन्यांपूर्वी मानवी चामर ही तीन वर्षांची चिमुरडी १६० क्रमांकाच्या अंगणवाडीत गेली आणि तिचे सुहानी पटेल या चार वर्षांच्या मैत्रिणीशी संभाषणच खुंटले. चामरला १६० क्रमांकाच्या अंगणवाडीवर रोखण्यात आले आणि १५९ क्रमांकाच्या अंगणवाडीत जाण्यास सांगण्यात आले.
अंगणवाडी क्रमांक १५९ दलितांसाठी आहे, त्यामुळे तू अन्यत्र जा, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर ती घरी आली आणि विचारले की, मी मैत्रिणीसमवेत १६० क्रमांकाच्या अंगणवाडीत का जाऊ शकत नाही? तिच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तरच नव्हते, असे तिची आई पिंकी चमार हिने सांगितले. अहमदाबादपासून १३० कि.मी. अंतरावर हाजीपूर हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात ७० टक्केपटेल समाज आहे. या गावातील दलितांची ४० घरे दोन मोहल्ल्यांत विभागली गेली आहेत. हाजीपूरच्या दोन अंगणवाडय़ांमध्ये ‘अस्पृश्यता’ हा आयुष्यातील पहिला धडा अजूनही शिकवला जात आहे.
अंगणवाडी क्रमांक १५९ ची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली. त्यानंतर तीन वर्षांनी पटेल आणि ब्राह्मणांनी स्वत:साठी स्वतंत्र अंगणवाडीची मागणी केली. त्यानंतर नवी अंगणवाडी क्र. १६० स्थापन करण्यात आली. या अंगणवाडीचे प्रवेशद्वार शाळेसोबतच असून शाळेच्या कुंपणाने या दोन अंगणवाडय़ा स्वतंत्र केल्या आहेत.
अंगणवाडय़ांबाबतचा हा दुजाभाव राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या निदर्शनास आला. सदस्यांनी या अंगणवाडय़ांचा दौरा करून आपला अहवाल सादर केला. आपल्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी अहवालावर कोणतीही कारवाई केली नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे नव्या अध्यक्ष भारतीबेन गढवी यांनी सांगितले. मात्र आपण याबाबत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून याबाबत दहा दिवसांत अहवाल मागविला आहे, असे गढवी म्हणाल्या.