जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर फुटीरतावाद्यांवरील कारवाईला वेग आल्याचे दिसत आहे. श्रीमनगरमध्ये जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) प्रमुख यासीन मलिक याला पोलिसांनी अटक केली आहे. यासीन मलिकने बंदचे आवाहन केले होते. दरम्यान, बुधवारपासून राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली आहे.
जेकेएलएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, काश्मीर खोऱ्यात निर्दोष नागरिकांच्या हत्येच्या विरोधात बंदचे आवाहन केले होते. आज (गुरूवार) पोलिसांनी मलिकच्या घरी जाऊन त्याला अटक केली. काश्मीर खोऱ्यात काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी आणि इतर निर्दोष नागरिकांची हत्या करण्यात आली. त्याविरोधात बंदचे आवाहन केले होते, असे त्यांनी म्हटले. सय्यद अली शाह गिलानी, मीरवाईज उमर फारूक आणि यासीन मलिक यांनी काश्मीर खोऱ्यात बंदचे आवाहन केले आहे.
गृह मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रमजान महिन्यात शस्त्रसंधी असतानाही दहशतवादी घटनांमध्ये २६५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामागे कट्टरपंथी शक्तींचे वाढलेले बळ हे यामागचे कारण सांगितले जात आहे.
दरम्यान, २८ जूनपासून अमरनाथ यात्राही सुरू होत आहे. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्यामुळे सुरक्षा दल सतर्क आहेत. आगामी काही दिवसात काही फुटिरतावादी नेत्यांना नजरबंद ठेवले जाईल किंवा अटक केली जाऊ शकते.