Serial Killer in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागच्या १४ महिन्यात नऊ महिलांचा खून झाल्यानंतर या परिसरात अज्ञात सीरियल किलरची दहशत पसरली आहे. नऊ महिलांचा खून एकाच पद्धतीने झाल्यामुळे सीरियल किलर यामागे असावा असा कयास बांधला जात आहे. बरेली ग्रामीण भागातील २५ किमीच्या परिघात आणि दोन पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावात सदर गुन्हा घडल्यामुळे या भागातील लोकांमध्ये सध्या घबराट पसरली आहे.
उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले की, सर्व पीडित महिला या ४५ ते ५५ या वयोगटातील होत्या. शेतात गळा दाबून पीडित महिलांचा खून झाला असून त्यांच्या शरीरावरील कपडे इतरत्र विखुरलेले पाहायला मिळाले. मात्र कुणावरही लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून आले नाही. सर्व हत्यांची पद्धत जवळपास सारखीच असल्यामुळे आम्ही सीरियल किलर असण्याची शक्यता नाकारलेली नाही.
पोलिसांनी ९० गावांमध्ये चौकशी केल्यानंतर तीन संशयितांचे स्केच प्रसारित केले आहे. या गुन्ह्यांची सुरुवात मागच्या वर्षी जून महिन्यात झाली. तेव्हा पहिल्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर आता नववा मृतदेह ३ जुलै रोजी आढळून आला आहे. सर्व हत्यांमध्ये जवळपास सारखीच पद्धत आहे. दुपारच्या सुमारास गळा दाबून खून करण्यात आला असून मृतदेह शेतात टाकण्यात आले आहेत. मात्र एकाही महिलेवर लैंगिक अत्याचार झालेला नाही.
तीन जणांना अटक मात्र…
पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. मात्र ते तिघे खरे गुन्हेगार नसावेत, असा तपास यंत्रणांना संशय आहे. कारण ते तुरूंगात असतानाही हत्या झालेल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता अलीकडे जामीन मिळालेल्या किंवा शिक्षा संपून सुटलेल्या कैद्यांच्या तपशीलांची छाननी करत आहेत.
हे ही वाचा >> Husband Kills Wife : लग्नानंतर अवघ्या काही तासांत पतीने केला पत्नीचा खून, कुठे घडली ही धक्कादायक घटना?
पोलीस अधीक्षक मनुष पारीक म्हणाले की, अलीकडे २ जुलै रोजी शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध पथके नियुक्त करून तपास सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या हत्येमध्ये समान धागा कोणता आहे? हे शोधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.