Serial killer arrested in Gujarat: गुजरात पोलिसांनी नुकतेच एका सीरियल किलरला अटक केली आहे. चार राज्यांमध्ये रेल्वेने प्रवास करत हा आरोपी एकट्या महिल्यांना आपले सावज बनवत असे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात एका १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करून पळालेल्या या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. राहुल जाट असे आरोपीचे नाव असून तो मुळचा हरियाणाच्या रोहतक येथील रहिवासी आहे. १४ नोव्हेंबर रोजी गुजरातच्या उदवाडा रेल्वे स्थानकाजवळ १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर आरोपी राहुल जाटचा शोध सुरू होता.
निर्जनस्थळी करायचा गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी सायंकाळी क्लासवरून येत असताना रेल्वे स्थानकाच्या निर्जनस्थळी आरोपीने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर बलात्कार करून तिची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर त्याने सवयीप्रमाणे पुन्हा राज्यातून पळ काढला. तेलंगणात एक गुन्हा करून तो पुन्हा गुजरातमध्ये आला होता. जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली, तेव्हा त्याच्या आदल्या दिवशीही त्याने तेलंगणामधील सिंकदराबाद रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेला लुटून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक करणराज वाघेला यांनी दिलेल्या महितीनुसार, वलसाड जिल्ह्यातील वापी रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधून राहुल जाटला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. गुन्हा करून त्याठिकाणाहून इतर राज्यात परांगदा व्हायचे, ही आरोपीची शैली होती. आम्ही तपास केल्यानंतर त्याने आतापर्यंत कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे केले आहेत.
पोलिसांना चौकशीनंतर समजले की, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेवर बलात्कार करून तिचा खून आरोपीने केला होता. तसेच पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाजवळ कटीहार एक्सप्रेसमध्ये एका वृद्ध प्रवाशावर त्याने वार केले होते. कर्नाटकच्या मुलकी येथेही त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे.
पोलीस अधीक्षक वाघेला यांनी सांगितले की, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यात राहुल जाटवर डझनभर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. “जाट ट्रेनने सतत प्रवास करत राहायचा. एकट्या महिलांना सावज बनवून तो त्यांना लुटायचा आणि बलात्कार करून खून करायचा. मागच्या वर्षभरात त्याने गुजरातच्या सूरत, वलसाड आणि वापी रेल्वे स्थानकाला चार ते पाच वेळा भेट दिली होती. ज्यादिवशी त्याने १९ वर्षीय तरुणीचा खून केला, त्यादिवशी तो त्याचा उरलेला पगार घेण्यासाठी एका हॉटेलात आला होता.
राहुल जाटला जेरबंद करण्यासाठी वापी पोलिसांनी बरीच मेहनत घेतली. अनेक ठिकाणी चौक्या बसवून शोधमोहीम राबविली. तसेच २००० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण तपासले गेले. त्यामुळेच त्यांना राहुल जाटचा स्पष्ट फोटो मिळू शकला, त्यावरून त्याला अटक करण्यात आली.
© IE Online Media Services (P) Ltd