इराकमध्ये बंडखोरांनी देशातील अनेक भागांत सोमवारी सकाळी केलेल्या बॉम्बस्फोटांत किमान ३१ जण ठार, तर सुमारे २०० जण जखमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.
अमेरिकन सैनिकांच्या माघारीनंतर इराकमध्ये प्रथमच निवडणुका होत आहेत. आठवडाभरात होणाऱ्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बंडखोरांनी देशभरातील अनेक भागांत बॉम्बस्फोट घडवून आणताना सुरक्षारक्षकांसाठी एक प्रकारे आव्हान निर्माण केले आहे. सोमवारी देशाच्या अनेक भागांत झालेल्या बॉम्बस्फोटांत कारबॉम्ब्सची संख्या अधिक होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. कारबॉम्बद्वारे घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी अल-काईदा या दहशतवादी संघटनेच्या इराकमधील शाखेतर्फे हे स्फोट घडवून आणण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बगदादसह सुन्नीबहुल असलेल्या फल्लूजाह, तसेच तेलासाठी प्रसिद्ध असलेल्या किरकुक व दक्षिणेकडील शिया मुस्लिमांची संख्या अधिक असलेल्या भागात हे आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आले आहेत.
उत्तर इराकमधील बकौबा भागात अल-काईदाचा वरचष्मा असल्याचे बोलले जाते. या ठिकाणाबरोबरच सद्दाम हुसैन यांच्या तिकरिटमध्येही स्फोट झाल्याचे वृत्त आहे. पूर्व बगदादमधील कमालिया भागात एका बस स्टॅण्डजवळ कारबॉम्बचा स्फोट झाला. त्यात चार जण ठार झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा