पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचं न ऐकता रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची भेट घेतल्यामुळे त्यांना त्याची किंमत मोजावी लागत आहे, असा आरोप रशियाने केलाय. या भेटीसाठीच इम्रान खान यांना शिक्षा दिली जात असल्याचं रशियाने म्हटलंय.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारिया झकारोव्हा यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं, “२३-२४ फेब्रुवारीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या भेटीची घोषणा केल्यानंतर अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांनी जोरदार दबाव आणला. तसेच हा रशिया दौरा रद्द करण्याबाबत अल्टिमेटम दिला. आपल्या स्वार्थी हेतूंसाठी एका स्वायत्त देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा अमेरिकेचा निर्लज्ज प्रयत्न आहे. वरील घटनाक्रम याला दुजोरा देतो.”

हेही वाचा : रशियाचं स्वस्त इंधन घेणार की नाही? निर्मला सीतारमन यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…

विशेष म्हणजे पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी देखील यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप केलाय. आपल्या रशिया दौऱ्यामुळे परकीय शक्ती विचलित झाल्याचं ते म्हटले. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याच दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला मॉस्कोमधील क्रेमलिन येथे ब्लादिमीर पुतिन यांना भेटले होते. अशी भेट घेणारे इम्रान मागील २३ वर्षांमधील पाकिस्तानचे दुसरे पंतप्रधान ठरले. त्याआधी नवाज शरीफ यांनी एप्रिल १९९९ मध्ये रशिया दौरा केला होता.

Story img Loader