आम आदमी पक्षाचे पंजाबमधील एकमेव खासदार भगवंत मान यांनी पंजाब भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने भाजपात प्रवेश करण्यासाठी पैसे आणि कॅबीनेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप भगवंत मान यांनी केला. यावर पंजाब भाजपाने प्रतिक्रिया देत त्या नेत्याचं नाव जाहीर करण्याचं आव्हान दिलंय. तसेच भगवंत मान आपमधील त्यांचं महत्त्व वाढवण्यासाठी असा दावा करत असल्याचा आरोप केला.

भगवंत मान म्हणाले, “मला भाजपाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला. त्यांनी भाजपात येण्यासाठी तुम्ही काय घ्याल? असा प्रश्न विचारला. तुम्हाला किती पैसे हवेत ते सांगा. तुम्ही खासदार आहात आणि एकमेव खासदार आहात त्यामुळे तुमच्यावर पक्षांतर्गत बंदीचा कायदा लागू होणार नाही. तुम्ही भाजपात या. तुम्हाला आम्ही कॅबिनेट मंत्रीपद देऊ.”

“मी एका मोहिमेवर आहे, कमिशनवर नाही”, मान यांचा भाजपावर हल्लाबोल

“मी भाजपाच्या नेत्यांना सांगितलं की मी एका मोहिमेवर आहे, ‘कमिशन’वर नाही. मी भरपूर पैसा देणाऱ्या करियरच्या सर्वोच्च स्थानी असताना ते सोडून पंजाबच्या हक्कासाठी राजकारणात आलो आहे. आम्ही २०१४ पासून आतापर्यंत घाम आणि रक्त आटवून आप पक्ष निर्माण केलाय,” असं भगवंत मान यांनी सांगितलं.

“ऑफर देणाऱ्या नेत्याचं नाव जाहीर करा”, भाजपाचं मान यांना आव्हान

भगवंत मान यांच्या दाव्यावर भाजपाच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिलीय. पंजाब भाजपाचे महासचिव सुभाष शर्मा म्हणाले, “भगवंत मान यांनी त्यांना पंजाब भाजपाच्या एका नेत्याचा फोन आल्याचा आणि त्यांनी पैसे व मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याचा दावा केलाय. मी भगवंत मान यांना आव्हान देतो की त्यांनी या नेत्याचं नाव सार्वजनिक करावं. त्यांनी ऑन रेकॉर्ड जनतेसमोर त्या नेत्याचं नाव सांगावं, म्हणजे सत्य समजेल. मात्र, ते असं करणार नाही. कारण खोटे आरोप करायचे आणि पळून जायचं ही आपची सवय आहे.”

हेही वाचा : “प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देणार”, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

भगवंत मान यांनी आप पक्षात त्यांचं महत्त्व वाढावं म्हणून हे आरोप केले आहेत. कारण पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा केली नाही. तसेच मान यांना आपमध्ये महत्त्व मिळत नाहीये.

Story img Loader