दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाने आपल्या मित्रांचे १० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असा आरोप केजरीवालांनी केला. तसेच मोदी सरकारने कर्जमाफी केलेल्या उद्योजकांनी भाजपाला किती देणगी दिली याची चौकशी व्हावी अशी मागणीही केली. आपने याबाबतचा केजरीवालांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं आणि वेळेवर पैसे परत केले नाहीत तर बँक तुमची जमीन जप्त करायला येते. त्यानंतर तुम्ही मंत्री, मुख्यमंत्र्याकडे बँकेच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी गेले तर कुणी मदत करतं का? कुणीही तुम्हाला बँकेच्या कारवाईपासून वाचवत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या उद्योगपती मित्रांचे १० लाख कोटी रुपये माफ केले आहेत.”
“मोदींनी उद्योगपती मित्रांचे १० लाख कोटी रुपये का माफ केले?”
“मोदींनी उद्योगपती मित्रांचे १० लाख कोटी रुपये का माफ केले? यांना आणखी पैसे माफ करायचे आहेत आणि त्यासाठी पैसे कमी पडल्याने आता मुलांच्या मोफत शिक्षणाला आणि मोफत रुग्णालयांना विरोध केला जात आहे. तसेच सरकारला तोटा होतो असा दावा केला जात आहे. तुमच्या मुलांना मोफत शिक्षण देणं महत्त्वाचं आहे की उद्योगपती मित्रांचे कर्ज माफ करणं योग्य आहे?” असा प्रश्न अरविंद केजरीवालांनी देशातील नागरिकांना विचारला.
“मोदींच्या पक्षाच्या देणग्यांची चौकशी करा”
“ज्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले आहेत त्यांनी मोदींच्या पक्षाला किती देणग्या दिल्या याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी केजरीवालांनी केली. तसेच या चौकशीतून उद्योगपतींची कर्ज मोफ करताना काय व्यवहार झाले होते हे स्पष्ट होईल, असंही नमूद केलं.