दिल्लीतील दंगलप्रकरणी सत्र न्यायालयाने तीन मुस्लीम तरुणांची निर्दोष मुक्तता केली. तसेच चौकशी करण्याआधी तक्रारींची सरमिसळ केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांना सुनावलं. तसेच दंगलीवेळी मुस्लीम जमावाने जय श्रीरामच्या घोषणा देण्याच्या आरोपावरही कठोर भाष्य केलं. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रमचला यांनी अकिल अहमद, रहीश खान आणि इरशाद या तिघांविरोधात कोणताही पुरावा नसल्याने त्यांना या खटल्यातून निर्दोष मुक्त केलं. त्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी चंदूनगर, करवाल नगर रोड या ठिकाणी दंगल करण्याचा आरोप केला होता.
या प्रकरणात दानिश यांनी त्यांच्या कुरियर ऑफिसचं दंगलीत नुकसान केल्याची तक्रार केली. त्यांनी दुकान लुटल्याचा आणि दुकानाला आग लावल्याचा आरोप केला. तसेच यामुळे ६-७ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं. दयालपूर पोलिसांनी दानिश यांच्या तक्रारीबरोबर त्याच ठिकाणावरील त्याच तारखेच्या इतर अनेक तक्रारी एकत्र केल्या.
“दंगल प्रकरणात चुकीच्या पद्धतीने फसवलं”
पोलिसांच्या आरोपानंतर या तिन्ही आरोपींनी ज्या दिवशी दंगल घडली त्या दिवशी आपण तेथे नसल्याचं सांगत आपण निर्दोष असल्याचं म्हटलं. तसेच त्यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने फसवण्यात आल्याचाही आरोप केला.
न्यायालयाने निकालात नेमकं काय म्हटलं?
या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने म्हटलं, “आरोपपत्रात तपास अधिकाऱ्याने २७ तक्रारी एकत्र केल्या आहेत. मात्र, तक्रारींच्या यादींचा उल्लेख करताना यात तीन आरोपींचा दोनदा उल्लेख करण्यात आला. मात्र, तपास अधिकाऱ्यांना त्यांनी या २७ तक्रारींचा तपास कधी केला हे सांगता आलं नाही. तपास अधिकाऱ्यांनी तक्रारदार दानिश यांच्या तक्रारीसह २७ तक्रारी एकत्र करून गुन्हा नोंदवला. मात्र, आरोपपत्र दाखल करताना केवळ दानिश यांच्या दुकान परिसरात पुरावे सापडल्याचं म्हटलं.”
“दंगल करताना मुस्लीम समुदायातील जमावाने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या यावर…”
“काही तक्रारींमध्ये जमाव जय श्रीरामच्या घोषणा देत असल्याचं म्हटलं आहे. शाहनवाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी जमावात भुल्लू आणि लाला हे असल्याचं नमूद केलं. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी आरोपपत्र दाखल करताना या तक्रारीबाबत काहीही उल्लेख केला नाही. तोडफोड करत दंगल करताना मुस्लीम समुदायातील जमावाने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. कारण फिर्यादींनीच या धार्मिक दंगली असल्याचं म्हटलं आहे,” असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं.
हेही वाचा : संगमनेरमध्ये दगडफेक-गाड्यांची तोडफोड कुणी केली? समनापूरचे प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा म्हणाले…
“तपास अधिकाऱ्यांना गुन्हा कधी घडला हेही सांगता आले नाही”
“तपास अधिकाऱ्यांनीच नोंदवलेल्या जबाबाप्रमाणे या ठिकाणी दोन गटात तणाव निर्माण झाला होता आणि त्यातूनच दंगल झाली. तपास अधिकाऱ्यांना या घटना नक्की कधी झाल्या याची वेळही सांगता आली नाही. यावरून तपास अधिकाऱ्यांनी ज्या सर्व तक्रारी एकत्र केल्या त्याचा पूर्ण तपास झालेला नाही हे स्पष्ट होत आहे,” असंही न्यायालयाने नमूद केलं.