लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी असतानाच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील खासदार सौमित्र खान यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसचे आणखी पाच खासदार निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करतील, असा दावाही भाजपा नेत्यांनी केल्याने तृणमूल काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
सौमित्र खान हे गेल्या काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज होते. पोलीस अधिकाऱ्याने मला ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर पक्षश्रेष्ठींनी सौमित्र यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासूनच सौमित्र खान हे पक्षनेतृत्वावर नाराज होते, असे सूत्रांनी सांगितले. बुधवारी सकाळी सौमित्र खान यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दुपारी त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पश्चिम बंगालमधील भाजपा नेते मुकूल रॉय यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मला मोदींसोबत काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
TMC Lok Sabha MP Soumitra Khan joins Bharatiya Janata Party (BJP) in Delhi. Union Minister Dharmendra Pradhan and West Bengal BJP leader Mukul Roy also present. pic.twitter.com/IDsBgB6IhF
— ANI (@ANI) January 9, 2019
पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेगणिक ढासळत असून राज्यातील गुंडांना तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला. पश्चिम बंगालमधील पोलीस निष्पाप तरुणांना तुरुंगात धाडत असून अशा परिस्थितीत मी त्या पक्षात राहू शकत नव्हतो. मी नरेंद्र मोदींच्या सबका साथ, सबका विकास धोरणाचे समर्थन करतो, असे त्यांनी सांगितले.
सौमित्र खान यांच्यापूर्वी मुकूल रॉय यांनी देखील तृणमूलमधून भाजपात प्रवेश केला होता. मुकूल रॉय हे ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. निवडणुकीपूर्वी आणखी पाच खासदार भाजपात येतील, असा दावा भाजपाचे नेते करत आहेत.