‘उबर’ या अमेरिकी कंपनीला लंडनमधील परिवहन विभागाने शुक्रवारी दणका दिला. ‘उबर’च्या लंडनमधील टॅक्सी सेवेच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यास परिवहन विभागाने नकार दिला आहे. ३० सप्टेंबरला ‘उबर’चा लंडनमधील परवाना संपणार असून परिवहन विभागाच्या निर्णयाला ‘उबर’ला न्यायालयात आव्हान देता येणार आहे.

ऑनलाइन टॅक्सी सेवा देणारी ‘उबर’ ही अमेरिकेतील कंपनी असून जभरातील विविध शहरांमध्ये ‘उबर’तर्फे टॅक्सी सेवा दिली जाते. ‘उबर’चा लंडनमधील टॅक्सी सेवेचा परवाना ३० सप्टेंबररोजी संपणार आहे. त्यामुळे ‘उबर’ने परवाना नुतनीकरणासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज परिवहन विभागाने फेटाळून लावला. ‘उबर’ कंपनी लंडनमध्ये टॅक्सी सेवा देण्यास सक्षम नाही असे परिवहन विभागाने म्हटले आहे. या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असल्याचे ‘उबर’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘उबर’ला २१ दिवसांच्या आत या निर्णयाला आव्हान देता येणार आहे. ही प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत ‘उबर’ला लंडनमध्ये टॅक्सी सेवा सुरु ठेवता येईल. मात्र न्यायालयातही विरोधात निकाल गेल्यास ‘उबर’ला लंडनमधून गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्हे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिवहन विभागाने ‘उबर’च्या चालकांनी केलेल्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेतली आहे. ‘उबर’ने वाहनचालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासण्याची तसदी घेतली नाही. तसेच या गुन्ह्यांप्रकरणी ‘उबर’नेही निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळेच परिवहन विभागाने ही कारवाई केल्याची चर्चा आहे. लंडनमधील महापौर सादिक खान यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले. कंपन्यांनी नियमांचे पालन केलेच पाहिजे असे त्यांनी सांगितले.

Story img Loader