US Federal Court on Donald Trump: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील फेडरल कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील लैंगिक शोषण प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दिलेला ५० लाख डॉलर्स भरपाई प्रकरणातील निकाल रास्त ठरवत तोच कायम केला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प महिन्याभराने अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतरदेखील त्यांच्याविरोधातील हा खटला न्यायालयात चालूच राहणार आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दी गार्डियनच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० च्या दशकात न्यूयॉर्कच्या एका स्टोअरमधील ड्रेसिंग रूमध्ये मॅगेझिन पत्रकार ई जीन कॅरोल यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात चाललेल्या खटल्यात त्यांना दोषी मानून ५० लाख अमेरिकन डॉलर्सचा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे. याविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी मॅनहॅटन येथील सर्किट कोर्ट ऑफ अपीलमध्ये नव्याने सुनावणी घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात सादर केलेले पुरावे हे डोनाल्ड ट्रम्प दोषी असल्याचं स्पष्ट करत आहेत, असं नमूद करत न्यायालयाने आधी दिलेला निकालच कायम ठेवला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना ५० लाख डॉलर्सचा दंड
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कॅरोल यांनी दिलेला जबाब आणि बहुचर्चित अॅक्सेस हॉलिवूड टेपमधील डोनाल्ड ट्रम्प यांचा रेकॉर्डेड आवाज या गोष्टी ट्रम्प यांच्याविरोधात न्यायालयासमोर मांडण्यात आल्या. या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना ५० लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात २० लाख डॉलर्स हे लैंगिक शोषणाचा दंड म्हणून तर ३० लाख डॉलर्स हे २०२२ साली डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅरोल यांचे आरोप फेटाळताना केलेल्या सोशल मिडिया पोस्टमधून त्यांच्या झालेल्या मानहानीची भरपाई म्हणून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
Donald Trump: अध्यक्ष बनले नि खटल्यांतून सुटले..! दोन गंभीर आरोपांतून ट्रम्प यांची तूर्त मुक्तता?
याआधीही ८३.३ मिलियन डॉलर्सचा झालाय दंड!
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना यााधीही जानेवारी २०२४ मध्ये कॅरोल यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दुसऱ्या एका खटल्यात न्यायालयाने तब्बल ८३.३ मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. त्या निकालाविरोधातदेखील डोनाल्ड ट्रम्प याचिका दाखल करणार असल्याचं समोर आलं आहे. ‘मी कॅरोलला कधीच भेटलो नाही आणि ती माझ्या टाईपची नाही’, असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅरोल यांचे आरोप फेटाळताना केलं होतं.
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही खटला चालणार
दरम्यान, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने १९९७ साली दिलेल्या एका निकालानुसार, एखाद्या व्यक्तीला ती राष्ट्राध्यक्षपदी आहे म्हणून गुन्ह्यांच्या खटल्यांपासून संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे २० जानेवारी २०२५ पासून डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू होत असून त्यानंतरदेखील हा खटला न्यायालयात चालणार आहे.