भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला आणखी एक झटका बसला आहे. लंडनमधील आलिशान घर वाचवण्यासाठी विजय मल्ल्याची स्विस बँक यूबीएस विरोधात कायदेशी लढाई सुरु आहे. बुधवारी यूबीएस बँकेविरोधात विजय मल्ल्याच्यावतीने करण्यात आलेला युक्तीवाद यूके उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
विजय मल्ल्याच्या रोझ कॅपिटल वेंचर्स कंपनीने लंडनच्या कॉर्नवॉल टेरेस स्थित आलिशान घर गहाण ठेवून यूबीएस बँकेकडून २०.०४ मिलियन पाऊंडचे कर्ज घेतले होते. ठरलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे यूबीएस बँकेला या निवासस्थानावर जप्ती आणायची आहे. पुढच्यावर्षी मे महिन्यापासून या खटल्याची सुनावणी सुरु होणार आहे.
मल्ल्याने भारतीय बँकांप्रमाणे यूबीएसचे कर्ज फेडले नाही तर त्याला हे निवासस्थान सोडावे लागेल. उच्च न्यायालयाने बुधवारी यूबीएसच्या अर्जामधील मुद्दे ग्राहय धरताना मल्ल्याचा युक्तीवाद फेटाळून लावला. यूबीएसने न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त करताना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर आताच बोलणे योग्य ठरणार नाही असे म्हटले आहे.
विजय मल्ल्या सध्या जामिनावर बाहेर आहे. भारताकडे त्याचे प्रत्यार्पण करण्यासंबंधीचा खटला सध्या यूकेमधील न्यायालयात सुरु आहे. भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. लंडनमधील न्यायालय पुढच्या महिन्यात त्याच्या प्रत्यार्पणा संबंधीच्या खटल्यावर निकाल देणार आहे.