हिमाचल प्रदेशच्या कुलू जिल्ह्यातील मनिकरण गुरूद्वारावर मंगळवारी मोठा खडक कोसळल्यामुळे सात जण ठार झाले आहेत. आज दुपारच्या सुमारास गुरुद्वाराच्या चार मजल्यांच्या इमारतीच्या मागच्या बाजूला हा खडक कोसळला. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. येथील पार्वती नदीच्या काठावर गुरूद्वाराची इमारत आहे. दरम्यान, आणखी काही खडक कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन हा संपूर्ण परिसर सध्या खाली करण्यात आला आहे. गुरूद्वारापासून जवळच असलेल्या डोंगरावरून खाली आलेला खडक थेट इमारतीच्या मागच्या बाजूला जाऊन आदळला. यामध्ये इमारतीच्या काही मजल्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, गुरुद्वारा सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या घटनास्थळी पोलीस आणि इंडो-तिबेटियन सीमा दलाच्या जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. मात्र, ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकले आहेत, याबद्दलची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही. पंजाब आणि उत्तर भागातील हजारो भक्त दर महिन्याला या गुरूद्वाराला भेट देण्यासाठी येतात.

Story img Loader