पीटीआय, कोलकाता
कोलकात्याच्या गार्डन रीच भागात सोमवारी मध्यरात्री एक पाच मजली निर्माणाधीन इमारत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांसह सात जण ठार व अनेक जण जखमी झाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि बेकायदा बांधकामाविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्थानिकांना आश्वासन दिले.
किमान चार जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याचे आढळले असून त्यापैकी फक्त एका जणाची जिवंत असण्याची लक्षणे दिसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे बचाव कार्यात गुंतलेल्या अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या दुर्घटनेमुळे राज्यातील राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
हेही वाचा >>>अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, गेल्या वर्षभरातील नववी घटना
या इमारतीचे बांधकाम अवैधरीत्या सुरू होते. अपघातस्थळी बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे, असे कोलकात्याचे महापौर फरहाद हकीम यांनी सांगितले. इमारतीचा प्रवर्तक मोहम्मद वसीमला अटक करण्यात आली असून, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.
दरम्यान, यामुळे राज्यात राजकीय वाद सुरू झाला आहे. भाजपने याचे वर्णन ‘तृणमूलकृत संकट’ असे केले आहे, तर सत्ताधारी तृणमूलने या घटनेचे राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. ‘तृणमूलने कोलकाता महापालिकेवर नियंत्रण मिळवल्यानंतर शहरातील पाच हजारांहून अधिक पाणथळ जागा अवैधरीत्या भरण्यात आल्या’, असा आरोप भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी केला.