गुजरातमध्ये पोलीस आणि राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करत असताना पुन्हा एकदा बिहारमधील सात जणांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री एका सिव्हिल इंजिनिअर आणि सहा प्लंबरवर हल्ला करण्यात आला. हे सर्वजण बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

दरम्यान पोलिसांनी हा हल्ला निर्वासित कामगारांविरोधातील द्वेषातून झाला नसल्याचा दावा केला आहे. पीडितांच्या ओळखीचा याच्याशी काही संबंध नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी एका आरोपीला पकडलं असून केयुर परमार अशी त्याची ओळख पटली आहे.

सिव्हिल इंजिनिअर शत्रुघ्न यादव आणि इतर सहा प्लंबर्स वडोदरा महापालिकेच्या प्राथमिक शाळेचं बांधकाम काम करत होते. सोमवारी संध्याकाळी शत्रुघ्न यादव इतरांसोबत निर्माणधीन इमारतीच्या बाहेर बसलेले असताना आरोपी परमार इतर तिघांसोबत तिथे आला आणि त्यांनी घातलेल्या कपड्यांवरुन प्रश्न विचारु लागला. त्यावेळी यादव आणि इतरांनी लुंगी नेसली होती.

आरोपींनी यादव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर झालेल्या हाणामारीत सातही जण जखमी झाले. दरम्यान यादव यांनी पोलीस कंट्रोल रुमला फोन करत मदत मागितली.

पीसीआर व्हॅन येताना दिसताच तिन्ही आरोपींनी तेथून पळ काढला. मात्र त्याआधी त्यांनी सर्वांना राज्य सोडून जाण्याची धमकी दिली. यानंतर यादव आणि इतर कामगारांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंद केली. जेव्हा ते परतले तेव्हा त्यांची दुचाकी आणि दोन खुर्च्यांना कोणीतरी आग लावल्याचं दिसलं. कंत्राटदाराने यादव यांना ही दुचाकी दिली होती.

घटनेची माहिती मिळताच सुरतमध्ये राहत असलेल्या कंत्राटदाराने घटनास्थळी धाव घेतली. ‘हल्ल्यामागे काय कारण होतं हे सांगण जरा कठीण आहे. त्यांनी तुम्ही लुंगी नेसणं आम्हाला आवडलं नसल्याचं सांगितलं होतं. हे थोडं आश्चर्यकारक आहे’, असं कंत्राटदार मयुर पटेल यांनी सांगितलं आहे. त्यांन दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी आणि प्लास्टिक खुर्च्या जाळल्यानंतर आरोपींनी पहिल्या मजल्यावर झोपलेल्या 40 ते 50 कर्मचाऱ्यांना धमकावलं.

‘जर तुम्ही आपलं तोंड बंद ठेवलं नाही आणि राज्य सोडून गेला नाहीत तर तुम्हालाही दुचाकीप्रमाणे जाळण्यात येईल अशी धमकी देण्यात आली’, अशी माहिती पटेल यांनी दिली आहे.

पोलीस निरीक्षक पीडी परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही एका आरोपीला अटक केली आहे. पण याचा निर्वासित कामगारांविरोधातील द्वेषाशी काही देणं घेणं नाही. आम्ही इतर आरोपींचा शोध घेत आहोत’.

Story img Loader