गुजरातच्या सूरतमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातल्या सात सदस्यांचा मृत्यू झाला. या सगळ्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आर्थिक चणचण भासू लागल्यामुळे या सगळ्यांनी आयुष्य संपवलं आहे असं समजतं आहे.
काय आहे हे प्रकरण?
या प्रकरणी झोन ५ चे डीसीपी राकेश बारोट यांनी म्हटलं आहे की सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या सोलंकी परिवारात सात लोक राहात होते. त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. या सात जणांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. कनुभाई सोलंकी आणि त्यांचं कुटुंब या घरात राहात होतं. कनुभाई यांचा मुलगा मनिषचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर कनुभाई, त्यांची पत्नी शोभनाबेन, मनिषची पत्नी रीटा, मनिषच्या १० आणि १३ वर्षांच्या मुली दिशा आणि काव्या तर मुलगा कुशल यांचे मृतदेह अंथरुणावर पडलेल्या अवस्थेत मिळाले.
पोलिसांनी काय सांगितलं?
मनिष सोलंकी हे इंटिरियल डेकोरेशन आणि फर्निचरचं काम करत होते. सोलंकी यांच्या घरात सुसाइड नोट आणि रिकामी बाटली मिळाली आहे. या सगळ्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. सुसाइड नोटमध्ये हे लिहिण्यात आलं आहे उधारी चुकवता न आल्याने हे पाऊल उचललं आहे असं लिहिण्यात आली आहे. आर्थिक चणचणीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. हे सगळे मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
या वर्षी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणीही अशीच एक घटना घडली होती. एका युवकाने त्याच्या पत्नीसह आणि मुलांसह आत्महत्या केली होती. लहान मुलांना विष देऊन त्यांना मारण्यात आलं. त्यानंतर या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अॅप लोनच्या जाळ्यात हे कुटुंब अडकलं होतं ज्यातून त्यांनी आयुष्य संपवलं.