पीटीआय, नवी दिल्ली
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) लखनौ येथील विशेष न्यायालयाने २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेगाडीतील बॉम्बस्फोटासह दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणात इस्लामिक स्टेट (आयसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेशी संबंधित सात दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा आणि त्यांच्या एका साथीदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.
या अधिकाऱ्याने सांगितले, की जागतिक दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’च्या नावाने देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी कट्टरपंथींची व तरुणांची भरती केल्याबद्दल गुजरातमधील आणखी एका विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने दोन भावांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ‘एनआयए’ने या दोन्ही निर्णयांमध्ये पुराव्यावर आधारित तपासाची परंपरा पाळून मैलाचा दगड गाठल्याचा दावा केला आहे. ‘एनआयए’ने सांगितले, की ही दोन्ही प्रकरणे ‘इंटरनेट’द्वारे ‘इस्लामिक स्टेट’च्या नावाने आरोपींना कट्टरपंथी बनवणे व त्यांना देशात हिंसक ‘जिहाद’ आणि दहशतवादी हल्ले करण्यास प्रवृत्त करण्याशी संबंधित आहेत. या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावल्याने ‘एनआयए’ने नोंदवलेल्या प्रकरणांत दोषी ठरविण्याचे प्रमाण ९३.६९ टक्क्यांवर पोहोचले असल्याचे अधिकाऱ्यानेसांगितले.‘एनआयए’च्या प्रवक्त्याने सांगितले की, २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमधील रेल्वेगाडीत झालेल्या बॉम्बस्फोटासह इतर दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणात लखनऊच्या विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने मंगळवारी मोहम्मद फैसल, गौस मोहम्मद खान, मोहम्मद अझहर, आतिफ मुझफ्फर, मोहम्मद दानिश, सय्यद मीर हुसेन व आसिफ इक्बाल ऊर्फ रॉकी यांना फाशीची शिक्षा सुनावली. तर मोहम्मद आतिफ ऊर्फ ‘आतिफ इराकी’ला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मारला गेलेला दहशतवादी मोहम्मद सैफुल्लासह या उत्तर प्रदेशच्या रहिवासी असलेल्या दोषींनी लखनऊच्या हाजी कॉलनी भागात लपण्याचे ठिकाण तयार केले होते. तेथे काही स्फोटक उपकरणे बनवली होती आणि त्याची चाचणी केली होती. दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी ही स्फोटके पेरण्याचा प्रयत्न केला. तपासात अशी अनेक छायाचित्रे सापडली, ज्यात आरोपी स्फोटक उपकरणे व दारूगोळा बनवताना दिसत आहेत. सोबत ‘इस्लामिक स्टेट’चा झेंडा आहे. या गटाने विविध ठिकाणांहून अवैध शस्त्रे आणि स्फोटके गोळा केल्याचा आरोप आहे. आतिफ, दानिश, हुसेन व सैफुल्लाह यांनी ७ मार्च २०१७ रोजी भोपाळ-उज्जैन प्रवासी रेल्वेगाडीत स्फोटक यंत्र लावले. त्याच्या स्फोटात दहा जण जखमी झाले होते. सर्व दोषी भारतात ‘आयसिस’च्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी व त्याच्या कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र आले होते, असा आरोपही ‘एनआयए’च्या प्रवक्त्याने केला.