पीटीआय, श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शनिवारी सिंगापूरच्या सात उपग्रहांना ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपित करून नियोजित कक्षेत सोडले. ‘इस्रो’ने सांगितले, की प्रक्षेपणानंतर सुमारे २३ मिनिटांनी आघाडीचा उपग्रह प्रक्षेपकापासून विलग झाला. त्यानंतर इतर सहा उपग्रहही आपापल्या कक्षेत स्थिरावले. या महिन्यात बहुप्रतीक्षित ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ‘इस्रो’ची ही आणखी एक महत्त्वाकांक्षी मोहीम होती. ‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’द्वारे (एनएसआयएल) ही मोहीम राबवली गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले, की प्रमुख उपग्रह ‘डीएस-एसएआर’ आणि इतर सहा उपग्रहांसह सात उपग्रह ‘पीएसएलव्ही-सी५६’द्वारे नियोजित कक्षांत यशस्वीरित्या सोडण्यात आले. शनिवारी सुरू झालेल्या २५ तासांच्या उलटगणतीनंतर ४४.४ मीटर उंच प्रक्षेपक रविवारी सकाळी साडेसहाच्या नियोजित वेळेच्या एक मिनिटानंतर ‘सतीश धवन अवकाश केंद्रा’च्या पहिल्या प्रक्षेपण तळावरून (लॉंच पॅड) प्रक्षेपित करण्यात आला. ‘इस्रो’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की हे प्रक्षेपक एका मिनिटानंतर सकाळी सहा वाजून ३१ मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात आले. कारण त्याच्या मार्गात अंतराळातील कचरा येण्याची शक्यता होती.

आणखी एक मोहीम

डॉ. सोमनाथ यांनी नियंत्रण कक्षातून सांगितले, की ‘एनएसआयएल’साठी हे ध्रूवीय उपग्रह प्रक्षेपक (पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल- ‘पीएसएलव्ही’) प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी आमच्या या प्रक्षेपकावर विश्वास दाखवल्याबद्दल मी सिंगापूर सरकारने प्रायोजित केलेल्या ग्राहकांचे आभार मानतो. आम्ही ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला आणखी एक ‘पीएसएलव्ही’ मोहीम राबवणार आहोत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven satellites of singapore isro successful launch by pslv launcher ysh