फ्लोरिडा येथील मियामी मध्ये नव्यानेच बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे अशी बातमी समोर आली आहे. तर याच अपघातात ९ जण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. मियामी विद्यापीठाच्या जवळ हा पूल आहे.

हा पूल अचानक कोसळल्याने त्याखाली दबून अनेक लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती फ्लोरिडा हायवे पॅट्रोलच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला दिली होती. हा पूल कोसळला त्याचे एरियल फुटेज समोर आले आहे. एकाच वेळी अनेक कार या पुलाखाली अक्षरशः चिरडल्या गेल्या. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. जे लोक या अपघातात जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच जे लोक या पूल पडल्याने अडकले आहेत त्यांना सोडवण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले आहे.

एका विद्यार्थ्याने या पुलासंदर्भात एक फोटो पोस्ट केला आहे. माझी परीक्षा संपल्याने शाळेला सुट्टी लागली आणि आज समजते आहे की काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळला. मी आणि माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या मित्राने पूल कोसळल्याचा आवाज ऐकला आणि आम्ही तातडीने बाल्कनीत आलो तेव्हा हे भयंकर दृश्य आम्हाला दिसले असे या विद्यार्थ्याने म्हटले आहे. शनिवारीच हा पूल बांधून पूर्ण झाला होता अशी माहितीही समोर येते आहे. पूल कोसळल्याने झालेल्या अपघातात नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

 

Story img Loader