Assam Coal Mine Accident : आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील एका कोळसा खाणीत भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी येथील एका कोळसा खाणीत पाणी शिरल्याने अनेक कामगार १२ तासांपेक्षा अधिक काळापासून खाणीत अडकले आहेत. दिमा हासाओचे पोलिस अधीक्षक मयंक कुमार यांनी खाणीत अडकलेल्या कामगारांची निश्चित संख्या माहिती नसल्याचे म्हटले आहे. मात्र स्थानिक रिपोर्टनुसार कामगारांची संख्या दहापेक्षा जास्त असू शकते.
ही घटना दिमा हसाओ जिल्ह्यातील उमारांग्सोच्या कलामती भागात घडली आहे. दिमा हसाओ हा जिल्हा डोंगराळ भाग आहे. दुर्घटना घडली तो भाग अत्यंत दुर्गम असून जिल्हा मुख्यालय हाफलाँग पासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर आहे. इतकेच नाही तर एसपी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी रात्री साडेआठ पर्यंत घटनास्थळी पोहचले नव्हते.
“ही घटना सकाळी घडली असून आम्हाला याची माहिती मिळताच बचाव पथके तेथे दाखल झाली. सुमारे सात तासांपासून बचावकार्य सुरू आहे,” असे एसपींनी संध्याकाळी ७ वाजता इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. बचावकार्य संथगतीने सुरू असून दोन मोटार पंपांच्या मदतीने शेकडो फूट खोल खाणीत भरलेले पाणी काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
लष्कराची मदत मागितली…
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घोषणा केली की, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दल या दुर्घटनास्थळी बचाव कार्यात मदत करण्यासाठी दाखल होत आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, खाणीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराची मदत मागण्यात आली आहे.
ही दुर्घटना घडली ते ठिकाण आसाम आणि मेघालय यांच्या सीमेजवळ आहे. याच ठिकाणी २०१८मध्ये भीषण खाण दुर्घटना घडली होत. ज्यामध्ये १५ कामगारांचा पाणी भरलेल्या रॅट होल खाणीत अडकल्याने मृत्यू झाला होता.
हेही वाचा>> २९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना