उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अधिकाधिक भीषण होत चालली असून गेल्या १५ दिवसांत महापुराच्या तडाख्यात ११६ जण मृत्युमुखी पडल्याचे बुधवारी अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
उत्तर प्रदेशातील १० जिल्ह्य़ांना महापुराचा मोठा तडाखा बसला असून शारदा, घागरा आणि शरयू या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बुधवारीही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. पुरातील लोकांना त्यांच्या सामानासह सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. लखिमपूर खेरी आणि सिद्धार्थनगर येथे पुराचे पाणी शिरण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.
बाराबंकीतील अलगीन पुलाजवळ घागरा नदी धोक्याच्या पातळीहून दोन मीटर अधिक उंचीवरून वाहत आहे. त्यामुळे हजारो जणांचे तेथून स्थलांतर करण्यात आले आहे. बलिया आणि अयोध्या जिल्ह्य़ात शरयू नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बस्ती, गोंडा आणि संत कबीरनगर येथे पुराने हाहाकार माजविला आहे.
मुसळधार पाऊस आणि विजेचा धक्का लागल्याने मंगळवारपासून चार जण ठार झाले आहेत. गोंडा जिल्ह्य़ात घराची भिंत कोसळून ज्योती ही लहानगीआणि अन्य दोघे जण ठार झाले. फतेहगढ येथे गंगा नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे, असे केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे.