डेंग्यू पसरवणाऱ्या डासांमध्ये एक जनुक असा असतो, ज्यात डासांचे लिंग बदलता येते. डासांमध्ये मादी चावत असते व तिच्यामुळेच डेंग्यू होतो. त्यामुळे डेंग्यूचा प्रसार नाहीसा करण्यासाठी सर्व माद्यांना नरांमध्ये रूपांतरित करता येते. या पद्धतीने डेंग्यूचा प्रसार रोखता येईल.
व्हर्जिनिया टेक येथील ‘फ्रॅलिन लाइफ सायन्स इन्स्टिटय़ूट’ या संस्थेतील संशोधकांनी डासांचे लिंग निश्चित करणारा जनुक शोधून काढला आहे. पिवळा ताप, चिकनगुन्या व डेंग्यू हे रोग पसरवणाऱ्या डासांमध्ये लिंगनिश्चिती करता येते.
केवळ मादी डासच माणसाला चावतात व रक्त पितात. रक्त हे त्यांचे अन्न नसते तर मानवी रक्तातील प्रथिनाच्या मदतीने ते अंडी घालतात, संशोधकांच्या मते नरांचे प्रमाण वाढले तर रोगांचा प्रसारच कमी होऊन जाईल. त्यामुळे वैज्ञानिकांच्या मते डासांचे जनुक बदलले, तर त्यांचे नरात रूपांतर करता येते एडिस एजिप्ती या डासात निक्स नावाचा जनुक डासांमधील लिंगभेदास कारणीभूत असतो. जनुकांची स्विचेस म्हणजे बटने जिनोममध्ये लपवलेली असतात, त्यामुळे आतापर्यंत ती सापडलेली नव्हती. निक्स या जनुकामुळे संसर्गजन्य रोग होणार नाहीत, अशा पद्धतीने डासांचे लिंग बदलून त्यांना नर करता येते, असे ‘कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अँड लाइफ सायन्सेस’ या संस्थेचे झिजियान जेक टू यांनी म्हटले आहे. वैज्ञानिकांनी डासांमध्ये निक्स हे जनुक डासांच्या गर्भपेशीत टोचले, तेव्हा त्यांचे लिंग बदलले. जेव्हा निक्स हे जनुक संपादन प्रक्रियेने काढण्यात आले, तेव्हा पुन्हा ते मादी बनले. जनुक संपादनासाठी सीआरआयएसपीआर सीए ९ ही पद्धत वापरली जाते. डासांना निरूपद्रवी करण्यासाठी त्यांचे रूपांतर नरांमध्ये करता येते व माद्यांची संख्या कमी करता येते. अजूनही यात पूर्ण यश आलेले नाही, निक्स या जनुकाचे विशिष्ट भाग माहिती असणे त्याचे रूपांतर नरांच्या जनुकात करण्यासाठी आवश्यक आहेत, असे कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अँड लाइफ सायन्सेस या संस्थेचे झ्ॉक अडेलमन यांनी सांगितले. एडिस एजिप्ती ही डासाची प्रजात मूळ आफ्रिकेतील असून इ.स. १७०० पासून ती जहाजांमधून इतरत्र पसरली. ही प्रजात मानवी आरोग्यासाठी घातक आहे. त्यातील काही प्रजाती रोगजंतूंचा प्रसार करतात. एडिस एजिप्ती डासांमध्ये जनुकीय बदल करण्याने पर्यावरणावर वाईट परिणाम होणार नाही व मानवाला डासांमुळे होणारे रोग होणार नाहीत, असे पीएच.डी.चे विद्यार्थी ब्रँटली हॉल यांनी सांगितले. हे संशोधन ‘सायन्स एक्स्प्रेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा