कर्नाटकच्या हासन लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि वर्तमान निवडणुकीत उमेदवार असलेला प्रज्ज्वल रेवण्णावर सेक्स टेप प्रकरणात बलात्काराचे आरोप केले गेले आहेत. या आरोपानंतर जनता दल (धर्मनिरेपक्ष) (JDS) पक्षाने त्याचे निलंबन केले होते. २६ एप्रिल रोजी हासन लोकसभेत मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णाने जर्मनीत पळ काढला. गेल्या काही दिवसांपासून त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. आता याच संदर्भात मोठी बातमी हाती येत आहे. उद्या ३० मे रोजी जर्मनीतील म्युनिक येथून रेवण्ण बंगळुरूत येण्यासाठी प्रस्थान करेल आणि ३१ मे रोजी ते बंगळुरूत पोहोचेल, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केलेली आहे. या पथकातील सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर पथक पाळत ठेवून आहेत. ३३ वर्षीय खासदार रेवण्णा विमानतळावर येताच त्याला अटक करण्यात येईल. तसेच सूत्रांनी असेही सांगितले की, याआधी त्याने जर्मनीहून बंगळुरूला येण्याचे तिकीट दोन वेळा रद्द केले आहे.
प्रज्ज्वल रेवण्णा हा एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचा उमेदवार आहे. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात त्याने मतदान केले होते. त्यानंतर त्याच्या कथित सेक्स व्हिडीओचा पेन ड्राईव्ह बाहेर काढण्यात आला. कर्नाटकमधील अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केले असल्याचे यावरून सांगितले गेले. प्रकरण देशभरात पसरल्यानंतर कर्नाटक सरकारने याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली. एसआयटीने सीबीआयमार्फत इंटरपोलला रेवण्णांचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती केली होती. प्रज्ज्वल रेवण्णावर आतापर्यंत बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रज्ज्वल रेवण्णाने काही दिवसांपूर्वी आपला एक व्हिडीओ प्रसारित केला होता. ज्यामध्ये त्याने ३१ मे पूर्वी तपास यंत्रणासमोर उपस्थित राहून चौकशीत सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. तसेच आपल्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असाही दावा त्याने केला होता. तसेच हे प्रकरण उजेडात आल्यानंतर मी तणावात आहे आणि एकटा पडलोय, असेही त्यांनी सांगितले. हसन लोकसभेतील काही राजकीय शक्ती माझ्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप रेवण्णाने केला.
तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये प्रज्ज्वल रेवण्णाने काँग्रेसवरही आरोप केले आहेत. “काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या इतर नेत्यांनी माझ्याविरोधात अपप्रचार केला. तसेच माझ्याविरोधात राजकीय कट रचला त्यामुळे मी खूप तणावात आहे”, असा दावा रेवण्णाने केला. माजी पंतप्रधान आणि रेवण्णाचे आजोबा एचडी देवेगौडा यांनी खुले पत्र लिहून रेवण्णाला शरणागती पत्करण्यास आणि चौकशीला सामोरे जाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेवण्णाने व्हिडीओ संदेस प्रसारित केला होता.