छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : पतीने पत्नीशी ठेवलेले लैंगिक संबंध, मग ते बळजबरीने का असेनात, बलात्कार ठरू शकत नाही, असा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ मध्ये नमूद केलेल्या अपवादांमध्ये म्हटले आहे की, पुरुषाने त्याच्या स्वत:च्या पत्नीशी केलेला संभोग किंवा लैंगिक कृत्य हे, जर ती १५ वर्षांपेक्षा कमी वयाची नसेल, तर बलात्कार ठरत नाही. याच कलमाचा न्यायालयाने आधार घेतला आहे.

न्या. एन. के. चंद्रवंशी यांनी गुरुवारी हा निकाल दिला आहे. त्याच वेळी न्यायालयाने आरोपी पतीला अनैसर्गिक कृत्ये (कलम ३७७) आणि महिलेशी क्रूर वर्तन (कलम ४९८ अ) या गुन्ह्यांसाठी मात्र दोषी ठरविले आहे. या आरोपीविरुद्ध बलात्काराचा खटला चालविता येणार नाही, कारण आरोपीची पत्नी जर १५ वर्षांपेक्षा अधिक वयाची असेल, तर तिच्यावर त्याने बलात्कार केल्याचे भारतीय कायदा मानत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

आपल्या पत्नीने केलेल्या तक्रारीवर आधारित आरोप निश्चित करण्याविरोधात पतीने उच्च न्यायालयात फौजदारी पुनरावलोकन अर्ज सादर केला होता. त्यानुसार न्यायालयाने कलम ३७६ अन्वये बलात्काराच्या शिक्षेसाठी दाखल केलेला आरोप हा त्रुटीपूर्ण आणि कायद्यात न बसणारा असल्याचा निकाल दिला. त्याच वेळी पतीविरुद्ध त्याच्या पत्नीने केलेल्या अनैसर्गिक कृत्ये आणि छळवणुकीच्या तक्रारीबाबतचे आरोप योग्य आहेत, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायालय म्हणाले की, तक्रारदार महिला ही याचिकादाराची कायदेशीर पत्नी आहे. त्यामुळे याचिकादाराने तिच्याशी केलेला संभोग किंवा कोणतेही लैंगिक कृत्य हे जरी तिच्या इच्छेविरुद्ध किंवा बळजबरीने केले असले तरी तो बलात्काराचा गुन्हा ठरू शकत नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, या महिन्याच्या आरंभी केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल दिला होता की, वैवाहिक संबंधांतील बलात्कार हा भारतात शिक्षायोग्य गुन्हा नसला, तरी घटस्फोट घेण्यासाठी असे कृत्य योग्य कारण ठरू शकते. कारण ही क्रूरता आहे.