जगातील सर्वात सुंदर, अप्रतिम वास्तू असलेल्या ताजमहालचे वर्णन अनेक कवी-साहित्यिकांनी केलेले आहे. प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक आणि सात आश्चर्यापैकी एक असलेल्या ताजमहालची भुरळ केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी पर्यटकांनाही आहे. मात्र या ताजमहालजवळच आणखी एक महाल होता, हे सांगितल्यावर कुणालाही पटणार नाही. भारतीय पुरातत्त्व विभागाने ताजमहालजवळ नुकत्याच केलेल्या उत्खननात एका नव्या वास्तूचा शोध लागला. ही वास्तू बादशहा शहाजहानचा उन्हाळी महाल होता, अशी माहिती पुढे आली आहे.
ताजमहालसमोर असलेल्या मुघल युगातील माहताब बागेमध्ये पुरातत्त्व विभागाने उत्खनन केले असता या महालाचे अवशेष मिळाले आहेत. हा एक बारादरी महाल असून, उन्हाळ्यामध्ये मोकळी हवा खाण्यासाठी या महालाची रचना केली असावी, असा पुरातत्त्व विभागाचा अंदाज आहे. माहताब बाग आणि हा उन्हाळी महाल हे शहाजहानचे आवडते ठिकाण होते. त्या ठिकाणी तो नेहमी येत असे. या महालातून ताजमहालचे रात्रीचे दृश्य अतिशय अप्रतिम दिसत असे. ते पाहण्यासाठी बादशहा नेहमीच या महालात येत असे. माहताबचा उर्दूमधील अर्थही चांदणे असा आहे. त्यामुळे या बागेला आणि या महालालाही माहताब असे नाव देण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.
यमुना नदीला वारंवार येणाऱ्या पुरांमुळे किंवा जमीन खचल्याने हा महाल जमिनीखाली गाडला गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
काळ्या ताजमहालची निर्मिती?
माहताब बागेबाबत परदेशी पर्यटकांना नेहमीच टुरिस्ट गाइड चुकीची माहिती देत असतात. माहताब बागेच्या ठिकाणी शहाजहान काळ्या संगमरवरी दगडांचा ताजमहाल बांधणार होता, असे पर्यटकांना नेहमीच सांगितले जाते. ‘‘शहाजहानला काळा ताजमहाल बांधण्याची इच्छा होती. तो यमुनेच्या दुसऱ्या काठावर काळा ताजमहाल बांधून दोन्ही ताजमहालला एका पुलाद्वारे जोडणार होता,’’ अशी चुकीची माहिती देऊन गाइड परदेशी पर्यटकांकडून पैसा उकळत असतात. मात्र काळा ताजमहालबाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे नसून, त्याबाबत नेहमीच चुकीची माहिती पुरवली जाते, असे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.