पीटीआय, हैदराबाद : हैदराबाद मुक्तिदिनानिमित्त भाजप आणि सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये शनिवारी शाब्दिक वाद रंगला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हैदराबाद मुक्तिदिन कार्यक्रमा’त राष्ट्रध्वज फडकवला, तर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ‘तेलंगणा जातीय एकत्रीकरण दिन’ साजरा केला.

हेही वाचा <<< मोदींकडून राष्ट्रउभारणीसाठी अतुलनीय परिश्रम; वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशांत मान्यवरांची भावना; नेते, चित्रपट तारे-तारकांकडून अभीष्टचिंतन

निजामाच्या ताब्यातून १७ सप्टेंबर १९४८ रोजी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले. त्यानिमित्त केंद्र सरकारने आयोजित केलेल्या ‘हैदराबाद मुक्तिदिन’ कार्यक्रमात शहा यांनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली. ‘‘मतांच्या राजकारणामुळे आणि रझाकारांच्या (एमआयएमच्या) भीतीने एवढय़ा वर्षांत हा दिवस अधिकृतपणे साजरा झाला नाही. निवडणुका आणि आंदोलनांमध्ये अनेकांनी हा दिवस साजरा करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते पूर्ण केले नाही’’ असे राव यांना उद्देशून शहा म्हणाले. पंतप्रधान मोदींनी निर्णय घेतल्यानंतर आता सगळेच हा दिवस साजरा करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा <<< दोनतृतीयांश आमदारांच्या पक्षांतरावर दोन राज्यांमधील भिन्न भूमिका; गोव्यात काँग्रेस बंडखोरांचा गट भाजपमध्ये विलीन; राज्यात शिंदे गटाचा शिवसेनेवरच दावा

दुसरीकडे तेलंगणा सरकारच्या कार्यक्रमात राव यांनी भाजपला लक्ष्य केले. ‘‘वाढत्या धर्माधतेमुळे या देशाचा आणि नागरिकांमधील सौहार्दाचा ऱ्हास होत आहे. १७ सप्टेंबर विलीनीकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या शक्ती तेलंगणाच्या इतिहासाचे राजकारण करत आहेत,’’ असा आरोप राव यांनी केला. तर तेलंगणाचे माहिती-तंत्रज्ञानमंत्री के. टी. रामाराव यांनी वल्लभभाई पटेल आणि शहा यांची तुलना करताना ‘‘७४ वर्षांपूर्वी एक गृहमंत्री आले आणि तेलंगणाच्या लोकांना त्यांनी भारताशी जोडले आणि आज एक गृहमंत्री फूट पाडायला आले आहेत’ असे ट्वीट केले.

ते (राव) हा दिवस साजरा करतात, पण त्याला हैदराबाद मुक्तिदिन म्हणत नाहीत. हजारो हुतात्म्यांना आदरांजली न वाहणे ही त्यांच्याशी प्रतारणा आहे.

    – अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

विखारी भाषा वापरून ते (भाजप) राजकीय फायद्यासाठी समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करीत आहेत.

    – के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा

Story img Loader