अभिनेता शाहरुख खान गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर राज्य करतोय. भारतासह जगभरात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. अभिनयासह शाहरुख क्रिकेटच्या क्षेत्रातही (आयपीेल) सक्रीय आहे. जगातल्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचाही समावेश केला जातो. मात्र, शाहरुख खान राजकारणापासून, राजकीय वक्तव्यांपासून नेहमीच दूर राहणं पसंत करतो. मात्र शाहरुख खानने एकदा राजकीय वक्तव्य केलं होतं, ज्याची बरीच चर्चादेखील झाली होती. त्याचं वक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होतोय. ज्यामध्ये त्याने भारतातल्या राजकारण्यांना एक सल्ला दिला होता. शाहरुखने यामध्ये राजकारण्यांना देशाशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला होता. त्या कार्यक्रमात शाहरुखसमोर राजकारण, बॉलिवूड आणि उद्योगजगतातील अनेक दिग्गज बसले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शाहरुख खानला प्रश्न विचारला होता की, राजकारणी लोकांना तू काय सल्ला देशील? अनेक कार्यक्रमांमध्ये प्रत्येक प्रश्नाला हजरजबाबीपणे उत्तर देणाऱ्या शाहरुखने राहुल गांधींच्या प्रश्नावरही त्वरीत आणि प्रामाणिक उत्तर दिलं. त्याने संपूर्ण भारतातल्या नागरिकांच्या मनातली गोष्ट सांगितली.

राहुल गांधींच्या प्रश्नावर शाहरुख खान आधी हसला आणि म्हणाला, “तुम्ही हा प्रश्न कोणाला विचारताय बघा…” त्यानंतर शाहरुखने तो काम करत असलेलं क्षेत्र आणि राजकारणाची गंमतीदार पद्धतीने तुलना केली आणि म्हणाला, “खोटं बोलणं आणि फसवणूक करणं हे माझं काम आहे. त्यामुळेच मी केवळ ढोंग (अभियन) करत असतो. कारण मी एक अभिनेता आहे.” यावर त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले लोक टाळ्या वाजवू लागले. लोकांच्या टाळ्या थांबल्यावर शाहरुखने गिअर बदलला आणि त्याने राजकारण्यांना प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला.

हे ही वाचा >> शरद पवार बारामती विधानसभेत युगेंद्र पवारांना अजित पवारांविरोधात उभं करणार? जितेंद्र आव्हाड म्हणाले…

किंग खान म्हणाला, “आपल्याला मिळालेलं काम प्रामाणिकपणे करणं आणि आपल्या देशाचा अभिमान बाळगणं हाच एक विचार असला पाहिजे.” त्यानंतर शाहरुख गंमत बाजूला ठेवून अधिक गंभीरपणे बोलू लागला. तो म्हणाला, “आपल्या देशावर प्रेम करा आणि टेबलाखालून पैसे घेऊ नका. तुम्ही योग्य पद्धतीने काम कराल तर आपण सर्वचजण पैसे कमावू शकतो. आपण सर्वजण आनंदी राहू आणि आपण एक महान राष्ट्र बनू, ज्याचा सर्वजण गौरव करतील. त्यामुळे मी सर्व राजकारण्यांना एकच सल्ला देईन की शक्य होईल तितकं प्रामाणिक बना.”

शाहरुखचं उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याची प्रशंसा केली. यामध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगदेखील होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan advice politician as rahul gandhi asked praised by manmohan singh asc
Show comments