अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या पठाण या चित्रपटाला सध्या विरोध होत आहे. आसाममध्ये या चित्रपटाचे ज्या सिनेमागृहात प्रदर्शन होणार होते, तेथे तोडफोड करण्यात आली. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी शाहरुख खान कोण आहे? मी त्याला ओळखत नाही. राज्यातील जनतेने हिंदी नव्हे तर आसामी भाषेतील चित्रपटांची काळजी करावी, अशी प्रतिक्रिया दिली होती. हिमंता बिस्वा शर्मा यांच्या या विधानानंतर आता शाहरुख खानने त्यांना रात्री दोन वाजता फोन केला आहे. रात्री दोन वाजता हिमंता शर्मा आणि शाहरुख खान यांच्यात चर्चा झाली आहे. याची माहिती खुद्द शर्मा यांनीच दिली आहे.
हेही वाचा >>>मोठी बातमी! अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी
रात्री दोन वाजता दोघांमध्ये चर्चा
“बॉलिवुड अभिनेते शाहरुख खान यांनी रात्री दोन वाजता फोन कॉल केला. रात्री दोन वाजता आमच्यात फोनवरून चर्चा झाली. गुवाहाटी येथे त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारचे असल्याचे म्हणत मी त्यांना आश्वासित केले आहे. आम्ही याबाबत चौकशी करू तसेच आगामी काळात अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेऊ,” असे हिमंता बिस्वा शर्मा यांनी ट्वीटद्वारे सांगितले.
हेही वाचा >>> ‘पठाण’च्या पहिल्या शोची तिकिटं मिळत नसल्याने चाहत्याने थेट घेतली किंग खानकडे धाव, अजब मागणी ऐकून शाहरुख म्हणाला…
हिमंता बिस्वा शर्मा काय म्हणाले होते?
बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी गुवाहाटी येथील चित्रपटगृहात शाहरुख खानच्या चित्रपटाचे पोस्टर्स जाळले होते. या घटनेबाबत पत्रकारांनी शनिवारी (२१ जानेवारी) हिमंता बिस्वा शर्मा यांना प्रश्न विचारले. याबाबत बोलताना ‘शाहरुख खान कोण आहे. मला त्याच्याबद्दल तसेच त्याच्या चित्रपटाबद्दल काहीही माहिती नाही,’ अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली होती. तसेच आसामच्या लोकांनी हिंदी नव्हे तर आसामी चित्रपटांची काळजी केली पाहिजे, असेही शर्मा म्हणाले होते.