दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांनी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी मुस्लिमांची फसवणूक केल्याचा आरोप बुखारी यांनी केली. त्यामुळे या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना पाठिंबा न देता कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचे त्यांनी शुक्रवारी जाहीर केले. जातीयवादी पक्षांकडून देशाला धोका आहे. त्यामुळे निधर्मी लोकांनी आपल्या मतांचे कोणत्याही स्थितीत विभाजन होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी आपण रोजगार, सच्चर समितीचा अहवाल, रंगनाथ मिश्रा समिती, मुस्लिमांची सुरक्षा यासह इतर अनेक मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा केली. त्यानंतरच मी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर करतो आहे. सोनिया गांधी यांनी दिलेली आश्वासन ते निवडणुकीनंतर पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे, असेही बुखारी यांनी सांगितले.