पीटीआय, कोझिकोड

‘महात्मा गांधींची हत्या करून देशाला वाचवल्याबद्दल मला नथुराम गोडसेचा अभिमान वाटतो,’ असे म्हणणाऱ्या केरळमधील एका प्राध्यापिकेला बढती देण्यात आली आहे. याप्रकरणी खटला प्रलंबित असताना दिलेली ही बढती वादात अडकली आहे.

गोडसेची भलामण करणाऱ्या डॉ. शैजा ए. यांची केरळच्या कालिकतमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील (एनआयटी) ‘नियोजन आणि विकास विभागा’च्या अधिष्ठातापदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. डॉ. शैजा यांनी गतवर्षी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीलाच समाजमाध्यमावर गोडसेची स्तुती केली होती. यावर टीका झाल्यानंतर त्यांनी हा संदेश काढून टाकला असला तरी त्यांच्याविरोधात ‘डीवायएफआय’, ‘एसएफआय’ या डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना आणि युवक काँग्रेसने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी फेब्रुवारी २०२४मध्ये त्यांची चौकशी केली. कुन्नमंगलम न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. असे असताना डॉ. शैजा यांनी नियोजन व विकास विभागाचे प्रमुखपद देण्यात आले आहे. कोझिकोडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रविण कुमार यांनी हा संघाची धोरणे लादण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत शैजा यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. तर माकपची विद्यार्थी शाखा असलेल्या ‘डीवायएफआय’ने याविरोधात एनआयटीवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

Story img Loader