अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्येनंतर दोन व्यक्तींचा पोलीस कसोशीने तपास करत आहेत. त्या दोन व्यक्ती म्हणजे अतिकची पत्नी शाईस्ता परवीन आणि गुड्डू मुस्लीम. आधी अशी चर्चा होती की, अतिकच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी शाईस्ता सर्वांसमोर येईल आणि पोलिसांसमोर अत्मसमर्पण करेल. परंतु असं झालं नाही. पोलीस सध्या शाईस्ताचा शोध घेत आहेत. हा शोध शाईस्ताच्या माहेरापर्यंत पोहोचला आहे. आता शाईस्तावर ५० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शाईस्ता उत्तर प्रदेशातल्या मोस्ट वॉन्टेड यादीत समविष्ट झाली आहे.
आता अनेकांना प्रश्न पडला असेल पोलीस शाईस्ताचा शोध का घेत असतील. तर ही शाईस्तादेकील गुन्हेगारांच्या जगातली मोठी व्यक्ती आहे. जेव्हा जेव्हा अतिक तुरुंगात जायचा तेव्हा तेव्हा अतिकचे सगळे काळे धंदे शाईस्ताच सांभाळत होती. तसेच अतिकच्या काळ्या कर्मांमध्ये तीही सहभागी होती. तिच्यावरही हत्येच्या प्रकरणात तक्रारी दाखल आहेत.
शाईस्ताचं वय ५० वर्ष इतकं आहे. तिचं १२ वी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण प्रयागराजमध्येच झालं आहे. १९९६ मध्ये तिचं अतिकशी लग्न झालं. तिला एकूण पाच मुलं आहेत. यापैकी असद अहमद अलिकडेच पोलीस चकमकीत ठार झाला आहे. तर तिची दोन मुलं अली आणि उमर तुरुंगात आहेत. तर दोन मुलं अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. शाईस्ताचे वडील एक पोलीस कर्मचारी होते.
हे ही वाचा >> अतिक अहमदच्या हत्येच्या निषेधाचे महाराष्ट्रात झळकले बॅनर, केला ‘शहीद’ असा उल्लेख
उमेश पाल हत्या प्रकरणातही शाईस्ता सहभागी होती. अतिक साबरमती तुरुंगात असताना शाईस्ता त्याला भेटायला आली होती. तिथेच या पती-पत्नीने उमेश पाल यांच्या हत्येबाबत चर्चा केली. तुरुंगात बसून अतिकने उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचला. त्याने शाईस्ताशी फोनवर संपर्कात राहून कट यशस्वी केला. दरम्यान, एका बांधकाम व्यावसायिकाने आरोप केला आहे की, शाईस्ता त्याला फोन करून सतत धमक्या देते. उमेश पाल हत्याकांडानंतर शाईस्ता फरार आहे. तिच्याविरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत.