विल्यम शेक्सपिअर यांची १५४ सुनीते कृत्रिम गुणसूत्रसाखळी अर्थात ‘डीएनए’मध्ये जतन करण्यात यश मिळवून संशोधकांनी जनुकीय जतन उपकरणाचा अभिनव पर्याय शोधला आहे. ईएमबीएल – युरोपीअन बायोइन्फॉर्मेटिक्स इन्स्टिटय़ूट (ईएमबीएल-ईबीआय) च्या प्रयोगशाळेतील संशोधकांचा हा शोध ‘नेचर’च्या ताज्या अंकात शब्दबद्ध झाला आहे. या शोधामुळे आता किमान दहा कोटी तासांच्या चित्रफितीही मूठभर गुणसूत्रसाखळीत जतन करणे शक्य झाले आहे.
सध्या जगात डिजिटल माहितीचा साठा ऊतू जाऊ लागला आहे. या घडीला तीन झेट्टाबाइटस् (तीन हजार अब्ज अब्ज बाइटस्) एवढय़ा असलेल्या या साठय़ात दिवसागणिक भरच पडत आहे. ही माहिती जतन कशी करायची, हा मोठा पेच आहे. ‘हार्डडिस्क’चा पर्याय खर्चिक आहे आणि त्यासाठी अखंड वीजपुरवठय़ाचीही गरज असतेच. विजेच्या आधाराची गरज नसलेल्या चुंबकीय टेपसारख्या पर्यायी जतनउपकरणांची क्षमताही अपुरी आहे. त्यातील माहितीही दशकभराने ओसरते. त्यामुळे गुणसूत्रसाखळीत माहितीचा साठा जतन करण्याचा मार्ग हा क्रांतिकारी ठरणारा आहे.
ईएमबीएल-ईबीआयचे निक गोल्डमन म्हणाले की, गुणसूत्रसाखळी ही आकाराने लहान असते आणि त्यातील माहितीच्या जतनासाठी कोणत्याही ऊर्जेची गरज नसते. गुणसूत्रसाखळीची उकल करणे आजवर शक्य होते पण त्यात माहिती जतन करण्याचे तंत्र अज्ञात होते. ते तंत्रच आता उकलता आल्याने कृत्रिम गुणसूत्रसाखळीत जतन झालेली माहिती पुढील दहा हजार वर्षे आणि त्याहीपुढे सुरक्षित राहणार आहे.

Story img Loader