Shakti Kapoor Kidnap Plan : बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान यांच्या अपहरणाचे प्रकरण समोर आल्यानंतर आता, उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ज्या टोळीने मुश्ताक खान यांचे अपहरण केले होते, त्याच टोळीने प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांचेही अपहरण करण्याचा कट आखला होता. या टोळीने शक्ती कपूर यांना एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ५ लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता. या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांचे अपहरण करण्याचा टोळीचा प्रयत्न होता. पण, शक्ती कपूर यांनी पाच लाख रुपयांचा प्रस्ताव अमान्य केल्याने हा कट फसला.
या टोळीचा दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याच्या अपहरणात सहभाग होता का, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या टोळीतील सदस्यांनी कथितपणे अभिनेते मुश्ताक खान यांचे दिल्ली विमानतळावरून अपहरण केले होते. त्यानंतर त्यांनी मुश्ताक खान यांना उत्तर प्रदेशातील बिजनौरला नेले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केले.
शक्ती कपूर यांच्या अपहरणाचा प्रयत्न
या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना बिजनौरचे पोलीस अधिक्षक अभिषेक झा म्हणाले की, “अभिनेते शक्ती कपूर यांना एका कार्यक्रमात बोलवून त्यांचेही अपहरण करण्याचा प्रयत्न होता. यासाठी आरोपींनी शक्ती कपूर यांना ५ लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता. पण शक्ती कपूर यांनी मोठी आगाऊ रक्काम मागितल्याने हा प्रस्ताव बारगळला. ही टोळी आणखी काही अभिनेत्यांच्या अपहरणात सहभागी होती का याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.”
मुश्ताक खान यांच्याबरोबर काय झाले?
मुश्ताक खान यांचे व्यवस्थापक शिवम यादव यांनी, खान यांच्या अपहरणाची तक्रार ९ डिसेंबर रोजी दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, “लवी उर्फ राहुल सैनी या व्यक्तीने मेरठ येथे १५ ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी २५ हजार रुपये आगाऊ रक्कम आणि विमान तिकिट पाठवले होते. २० नोव्हेंबर रोजी मुश्ताक खान दिल्ली विमानतळावर पोहचल्यानंतर, त्यांना घेण्यासाठी एक गाडी आली होती. त्यानंतर खान यांना मेरठ-दिल्ली मार्गावर नेण्यात आले.”
विमानतळावरून दिल्ली-मेरठ मार्गावर नेल्यानंतर अभिनेते मुश्ताक खान यांना दुसऱ्या गाडीत बळजबरीने बसवण्यात आले. त्यावेळी त्या गाडीत असलेल्या तीन ते चार जणांनी मुश्ताक खान यांचे बँक तपशील घेतले होते. त्यानंतर आरोपींनी वेळोवेळी खान यांच्या खात्यातून तीन लाखांहून अधिक रक्कम काढली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा तपास सुरू आहे.
गदर, वाँटेडमध्ये अभिनय
मुश्ताक खान हे अभिनय क्षेत्रात नावाजलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे १०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये गदर, वाँटेड, विवाह आणि वेलकम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.