‘न्यू इंडिया’मध्ये गोरखपूरसारखी लाजिरवाणी घटना घडायला नको असे मत व्यक्त करत केंद्रीय अर्थ आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तर दगडफेक करणाऱ्यांची आर्थिक रसद बंद होताच जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार कमी झाला असा दावाही त्यांनी केला.

रविवारी मुंबईत भाजपतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अरुण जेटली उपस्थित होते. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार गोरखपूरमधील घटनेवरुन जेटलींनी योगी सरकारवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. नवभारत घडवत असताना गोरखपूरसारखी लाजिरवाणी घटना देशात घडायला नको असे ते म्हणालेत. गोरखपूरमध्ये बाबा राघव दास रूग्णालयात गेल्या आठवड्यात प्राणवायूअभावी ७२ बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानेही योगी आदित्यनाथ सरकारला जाब विचारला असून विरोधकांनीही योगी आदित्यनाथांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता अरुण जेटलींनी घरचा आहेर दिल्याने योगी आदित्यनाथांची नाचक्की झाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केले. दगडफेक करणाऱ्यांची आर्थिक रसदच बंद केली पाहिजे. फुटिरतावाद्यांवर एनआयएने केलेल्या कारवाईचा दाखला देत जेटली म्हणाले, दगडफेक करणाऱ्यांना जी लोक आर्थिक मदत करत होती त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेला परिणाम दिसून येतो. दगडफेकीच्या घटनाही कमी झाल्या असून बऱ्याचदा पळ काढण्यासाठी दहशतवादी स्वतःच दगडफेक करतात असा दावाही त्यांनी केला. नोटाबंदीनंतर एनआयएने फुटिरतावाद्यांना परदेशातून मिळणारी आर्थिक रसदच बंद केली. आता फुटिरतावाद्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे असे त्यांनी सांगितले.  मी आणि सुषमा स्वराज आम्ही दोघे विरोधी पक्षनेतेपदावर असताना आमचे काम सोपे होते. तत्कालीन सरकारमध्ये भ्रष्टाचार असल्याने रोज नवीन प्रकरण उघड व्हायचे असे सांगत त्यांनी काँग्रेसला चिमटा काढला.

Story img Loader