Swami Avimukteshwaranand : बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेना फुटीवर भाष्य करत उद्धव ठाकरेंना सोडणाऱ्यांना विश्वासघातकी म्हटले होते. दोन दिवसांपासून स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची वक्तव्ये चर्चेत असतानाच आता माध्यमांनी त्यांना संन्यासी असून राजकीय भाष्य कसे काय करता? असा प्रश्न विचारला आहे. यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राजकारण्यांनाच आव्हान दिले आहे.

काय म्हणाले स्वामी अविमुक्तेश्वरानंद?

माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, “मी संन्यासी आहे. त्यामुळे राजकीय भाष्य करणे मी टाळले पाहीजे, हे खरे आहे. मात्र हाच नियम राजकीय पुढाऱ्यांनाही लागू होतो. त्यांनीही धार्मिक बाबीत लुडबुड करता कामा नये. पंतप्रधान मोदी मंदिरात येऊन प्राणप्रतिष्ठा करू लागले, तर माध्यमे त्याचे थेट प्रक्षेपण करतात. जर शंकराचार्य मंदिर आणि धर्माबाबत बोलले तर तुम्ही आम्हालाच उलट ज्ञान देत आहात. राजकारण्यांनी धर्मात हस्तक्षेप करणे बंद करावे आणि गॅरंटी देतो की, आम्हीही राजकारणाबाबत बोलणे बंद करू.”

हे वाचा >> Swami Avimukteshwaranand : ‘विश्वासघातकी लोक हिंदू कसे?’, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा घणाघात; म्हणाले, “उद्धव ठाकरे पुन्हा..”

फक्त हिंदू, हिंदू बोलून चालत नाही

तुम्ही आमच्या धर्मात वारंवार हस्तक्षेप करत आहात आणि आम्ही धर्माच्या बाबतही बोलायचे नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “राजकारणी जर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेत असतील त्यांनी धर्माचे पालन करायला हवे. धर्माचे मर्म जाणून घेऊन ते आचरणात आणणारेच खरे हिंदू असतात. धर्माचाऱ्याने वेळोवेळी धर्माची व्याख्या करणे गरजेचे आहे, अन्यथा धर्माचाऱ्याने त्याचे काम केले नाही, असे होईल. म्हणून मी वेळोवळी धर्माची व्याख्या करत असतो” असेही ते म्हणाले.

Swami Avimukteshwaranand uddhav Thackeray
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्री निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी त्यांचे दर्शन घेतले.

शंकराराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले, माझे राजकारणाशी काही देणेघेणे नाही. पण राजकारण्यांनीही विश्वासघातासारखे कार्य करणे योग्य नाही. ज्यांनी उपकार केले, त्यांच्याच विश्वासघात करणे योग्य नाही.

हे ही वाचा >> Swami Avimukteshwaranand alleges Kedarnath Gold Scam : ‘केदारनाथ धाम मंदिरात २२८ किलो सोन्याच्या जागी पितळ बसवलं’, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा आरोप

अविमुक्तेश्वरानंद पंतप्रधान मोदींबद्दल काय म्हणाले?

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल मोठे विधान केले होते. अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, “नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत. नरेंद्र मोदी आले त्यांनी नमस्कार केला, त्यांना आम्ही आशीर्वाद दिला. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत. त्यांच्या हिताच्या गोष्टी आम्ही सांगत आहोत. जर त्यांच्याकडून चूक झाली तर आम्ही त्यांची चूक दाखवून देतो, मोदी आमचे शत्रू नाहीत.”

Story img Loader