गेल्या काही दिवसांपासून लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणावरून बराच राजकीय वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या भाषणावर तेव्हा सत्ताधारी बाकांवरून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. राहुल गांधींच्या भाषणातील काही भाग वगळण्यात देखील आला होता. त्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना दुसरीकडे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधींच्या भाषणाबाबत मोठं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदू धर्माबाबत काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधींनी आपल्या भाषणात हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे. “हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही. कधीही द्वेष आणि भीती पसरवू शकत नाही. त्यामुळे हे लोक (सत्ताधारी पक्ष) हिंदू नाहीयेत. कारण ते २४ तास हिंसेवरच बोलत असतात. नरेंद्र मोदी, भाजपा किंवा आरएसएस म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही. हा ठेका काही फक्त भाजपानं घेतलेला नाही. तुम्ही हिंदू नाही आहात. हिंदू धर्मात स्पष्टपणे म्हटलं आहे की सत्यासोबत आपण उभं राहायला हवं. सत्यापासून दूर जाता कामा नये. माझं बोलणं यांच्या मर्मावर लागल्यामुळेच हे आरडाओरड करत आहेत”, असं राहुल गांधी लोकसभेतील भाषणादरम्यान म्हणाले होते.

शंकराचार्यांची नेमकी भूमिका काय?

दरम्यान, एकीकडे सत्ताधारी पक्षांकडून राहुल गांधींना हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केल्याचा दावा करत लक्ष्य केलं जात आहे. मात्र, दुसरीकडे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे. राहुल गांधींचं पूर्ण भाषण आपण ऐकलं असून त्यात ते काहीही चुकीचं बोलले नसल्याची भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. तसेच, यासाठी त्यांनी कावळ्याचं उदाहरणही दिलं.

काय म्हणाले स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती?

“आम्हाला जेव्हा कुणी सांगतं की कावळ्यानं कान चावला, तेव्हा आम्ही आधी कानाला हात लावून तपासतो की कान व्यवस्थित आहे की नाही. जर कान व्यवस्थित नसेल, तर आम्ही कावळ्याच्या मागे लागतो. राहुल गांधींनी हिंदू धर्मविरोधी वक्तव्य केल्याचं जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं, तेव्हा आम्ही राहुल गांधींनी संसदेत दिलेलं संपूर्ण भाषण ऐकलं. आम्ही त्यात पाहिलं की हिंदू धर्माविषयी ते काहीही चुकीचं बोलत नाहीयेत. ते तर म्हणतायत की हिंदू धर्मात हिंसेला जागाच नाहीये”, असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

लालकिल्ला: आता भाजपच्या हिंदुत्वावर घाव?

“भाषणातला निवडक भाग काढून प्रसार करणं चुकीचं”

“जर राहुल गांधी म्हणत असतील की हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही, तर मग त्यांच्यावर हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केलंय असा आरोप करणं, त्यांच्या भाषणातला निवडक भाग काढून त्याचा प्रसार करणं हा गुन्हा आहे असं आम्हाला वाटतं. हा अपप्रचार आहे. असं करणाऱ्या लोकांना शिक्षा व्हायला हवी. मग ते माध्यम प्रतिनिधी का असेनात. हे चुकीचं आहे”, अशा शब्दांत स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“एखाद्या व्यक्तीने जी गोष्ट म्हटलेलीच नाही त्यासाठी त्या व्यक्तीला विरोध करणं, त्याला दोषी मानणं चुकीचं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हिंदू हिंसा करू शकत नाही. त्यानंतर जे लोक समोरच्या बाजूला सरकारी पक्षात बसलेत, त्यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणता आणि हिंसा हिंसा म्हणत द्वेष पसरवता. त्यामुळे त्यांचं म्हणणं विशिष्ट पक्षासाठी आहे. त्याच्या आधीच्या वक्तव्यात ते हिंदू धर्माविषयी बोलले. आम्ही त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं आणि त्यात आम्हाला काहीही चुकीचं वाटलं नाही”, असंही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद जी यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shankaracharya swami avimukteshwaranand saraswati on rahul gandhi hindu statement in loksabha parliament monsoon session pmw
Show comments