वेरूळ येथील जयबाबाजी भक्त परिवाराचे महाराज शांतिगिरी आणि खासदार चंद्रकांत खैरे यांची बुधवारी भेट झाली. त्यानंतर निवडणुकीत उतरणार नसल्याचा निर्णय शांतिगिरी महाराजांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केला. हिंदू मतांत फूट होऊ नये, अशी आपली इच्छा असून औरंगाबादसह सात मतदार संघात तीच भूमिका राहील, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. राजकारणात चांगली माणसे यायला हवीत म्हणून लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, असे अभियान हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, असे ते म्हणाले खरे, मात्र हिंदू मतांमध्ये फूट पडू नये, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार चंद्रकांत खैरे आणि शांतिगिरी महाराज यांच्यात २००९ च्या लोकसभा निवडणुकीत लढत झाली होती. तेंव्हा शांतिगिरी महाराजांनी घेतलेल्या मतांमुळे विश्लेषकही चक्रावले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी शांतिगिरी महाराजांची भेट घेणे हा राजकीय उपक्रम होऊन बसला होता. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली होती. तत्कालीन काँग्रेसचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर ते निवडणुकीत उतरतील, असे सांगितले जात होते. मात्र त्यांनी तेव्हा माघार घेतली. मोदी लाटेत खासदार खैरे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला, असे मानले जात होते. या वेळी शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्यानंतर त्यांची भूमिका काय, अशी विचारणा होत होती. बुधवारी बैठक घेऊन उमेदवारांपैकी स्वार्थी आणि निस्वार्थी अशी उमेदवारांनी विभागणी करून मतदान करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. खासदार खैरे स्वार्थी की निस्वार्थी, असा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. मात्र आज सकाळी खासदार खैरे यांची भेट झाली होती, या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. चर्चा केल्याचेही मान्य केले आणि हिंदू मतांमध्ये फूट पडू नये, अशी भूमिका मांडली. त्यांच्या या निर्णयाचे भाजप-शिवसेना नेत्यांनी स्वागत केले. यापूर्वी काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांचीही भेट झाल्याचे त्यांनी सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shanti giris retreat after mp khaires meeting