नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका छोटय़ाशा बेटाबद्दल बोलतात, पण चीनने भारताच्या हजारो चौरस फूट जमिनीवर अतिक्रमण केले त्यावर ते काही बोलत नाही. चीनच्या अतिक्रमणावर मोदींनी जाणीवपूर्वक मौन बाळगले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे वध्र्याचे उमेदवार अमर काळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखला केला. त्यासाठी नागपुरात आलेल्या शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी दक्षिणेत दौऱ्यावर असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काचाथिवू बेट श्रीलंकेला दिल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. एका बाजूला मोदी हयात नसलेल्या इंदिरा गांधी यांच्यावर हल्ला करतात, तर दुसऱ्या बाजूला हजारो चौरस फुटांची जागा त्यांनी चीनला दिली. त्यावर ते एक शब्दही काढत नाहीत. देशातील कुठल्याही राष्ट्रीय घटनांकडे ते गांभीर्याने पाहत नाही, अशी टीकाही पवारांनी केली.

हेही वाचा >>>‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका

लोकांचा ‘मूड’ बदलला

लोकांचा ‘मूड’ बदलला आहे. यावेळी कोणाला विजयी करायचे म्हणून नागरिक मतदान करणार नाहीत तर भाजपला पराभूत करण्यासाठी मतदान करणार आहेत. जेथे जेथे भाजपला पराभूत करणारा उमेदवार असेल त्याला मतदान करतील. पवारांचे राजकीय आयुष्य संपुष्टात आले, असे म्हणणाऱ्या विरोधकांना २०१९ च्या निवडणुकीत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसावे लागले होते, याची आठवणही पवारांनी करून दिली. लोकशाही आणि राज्यघटनेवर हल्ला होत आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून इंडिया आघाडी झाली आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीसोबत अजूनही चर्चा सुरू आहे, असेही पवार म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar accused narendra modi of silence on china encroachment amy
Show comments