मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर मार्गाचे काम गेल्या ११ वर्षांपासून रखडले आहे. अतिवृष्टी आणि अवजड वाहतुकीमुळे या मार्गावरील रस्ता वारंवार खराब होत आहे. त्यामुळे पळस्पे ते इंदापूर मार्गाचे डांबरीकरणा ऐवजी क्राँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
“…तिथले अधिकारी म्हणतात, ही गडकरींची कृपा”, नितीन गडकरींचं कौतुक करताना शरद पवारांनी सांगितला अनुभव!
मुंबई गोवा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप अशा दोन टप्प्यात हे काम केले जात आहे. इंदापूर ते झाराप दरम्यानचा महामार्ग हा काँक्रीटीकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. तर पळस्पे ते इंदापूर या पट्ट्यातील महामार्गाचे डांबरीकरण केले जात आहे. मात्र अवज़ड वाहतुक आणि अतिवृष्टी यामुळे या मार्गाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन इंदापूर ते झाराप प्रमाणे पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी शरद पवार आणि सुनील तटकरे यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे. यासाठी लागणारा वाढीव निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
गडकरी यांनी ही मागणी तत्वतः मान्य केल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी याभेटीनंतर सांगीतले. तसेच संदर्भात दिल्ली येथे लवकरच एका बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.