ED Raids V Senthil Balaji : तामिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी देशातील विरोधी पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रातील मोदी सरकारवर घणाघात केला आहे.
ट्वीट करत शरद पवार म्हणाले, “विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यातील मंत्र्यांवर ईडीकडून सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत. याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. सेंथिल बालाजी यांच्या कार्यालयांवर छापे टाकून अलोकशाही केंद्र सरकारने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांत प्रवेश केला आहे.”
हेही वाचा : “शेतकरी आंदोलनाच्या वेळी मोदी सरकारने धमकावलं”, ट्विटरच्या माजी सीईओच्या आरोपांवर सरकारचं उत्तर, म्हणाले…
ऊर्जामंत्री असलेले व्ही. सेंथिल बालाजी करूर जिल्ह्यातून येतात. ईडीला तपासात सहकार्य करणार असल्याचं सेंथिल यांनी सांगितलं. “ईडी कशाचा शोध घेत आहे, याची माहिती नाही. पण, तपासाला संपूर्ण सहकार्य करणार,” असं सेंथिल यांनी म्हटलं.
हेही वाचा : २२० महिन्यांत २२५ घोटाळे आणि फक्त २१ नोकऱ्या! प्रियंका गांधी यांची भाजपवर टीका
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी ईडीच्या छापेमारीवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. “भाजपा ज्यांचा राजकीयदृष्ट्या सामना करू शकत नाही, त्यांना धमकावलं जातं आहे. भाजपाच्या दहशतीचे राजकारण जनता पाहत आहे,” असं एम. के स्टॅलिन म्हणाले.