राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही क्रॉस वोटिंग झालं. यातून महाविकास आघाडीच्या हाती पुन्हा पराभव आला आणि भाजपाने सलग दुसऱ्यांदा आपले सर्व उमेदवार जिंकून आणले. यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं राजकीय भूकंप निर्माण झाला. याच क्रॉस वोटिंगच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. तसेच त्यांच्याकडे १९८० मध्ये ६ आमदार असताना कसे ४५ आमदारांची मतं मिळवली, याचा किस्सा त्यांनी सांगितलं. ते दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “अशा निवडणुका होतात तेव्हा क्रॉस वोटिंग होतं. हे काही आजच घडत आहे असं नाही. याआधी मागील ५० वर्षात मी अनेकदा क्रॉस वोटिंग होताना पाहिलं आहे. क्रॉस वोटिंग झाल्यानंतर देखील सरकार चालतं. एखादा उमेदवार निवडणुकीत उभा आहे आणि त्याला २-४ मतांची कमतरता असेल, तर तो उमेदवार त्याच्या व्यक्तिगत संबंधांचा वापर करतो. त्यामुळे या निवडणुकीत काही प्रमाणात क्रॉस वोटिंग होते.”
“१९८० मध्ये माझ्याकडे केवळ ६ आमदार होते. तेव्हा ६ आमदारांच्या बळावर ४५ मतं घेऊन आम्ही सुरेश कलमाडी यांना राज्यसभा निवडणुकीत निवडून आणलं होतं. हे असं होतं. तुमचे इतर नेत्यांशी संबंध कसे आहेत त्यावर हे ठरतं. अशा निवडणुकींमध्ये विजय मिळतो किंवा पराभव होतो,” असं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच आघाडीत अजिबात मतभेद नाहीत, असंही नमूद केलं.
पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय अशी मागणी असल्याचं सांगत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी, “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं ते बोललेत हे मला माहिती नाही. तुमच्याकडूनच मला हे समजतंय,” असं सांगितलं. पुढे बोलताना शरद पवारांनी, या सरकारमधील मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि इतर पदं काँग्रेसकडे आहेत, असं सांगितलं. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासंदर्भातील निर्णय घ्यावा असं सूचित करतानाच दुसरीकडे सध्या राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे.
सध्या निर्माण झालेल्या या राजकीय पेजामधून मार्ग निघेल याची नक्की खात्री असल्याचं पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये दोन ते तीन वेळा अधोरेखित केलं. विधान परिषदेमध्ये झालेल्या क्रॉस व्होटिंगसंदर्भात बोलताना शरद पवारांनी, क्रॉस व्होटिंग होऊनही सरकार चालतं हा ५० वर्षांचा अनुभव आहे, असं उत्तर दिलं.