राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. अशातच या बैठकीत पंतप्रधानांशी महाराष्ट्रातील कारवायांवर बोललात का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना शरद पवार यांनी नाही असं उत्तर दिलं. मात्र, संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत मोदींच्या कानावर घातल्याचंही नमूद केलं.

शरद पवार म्हणाले, “मी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत दोन विषयांवर चर्चा केली. एक मागील दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघांमधील प्रतिनिधींच्या जागा मागील दोन अडीचवर्षांपासून रिक्त आहेत.”

“महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांबाबत मी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली नाही. मी यातील केवळ एका प्रकरणावर त्यांच्याशी चर्चा केली. हे प्रकरण एका पत्रकाराशी संबंधित आहे. त्या पत्रकाराचं नाव आहे संजय राऊत. संजय राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत, मात्र ते महाराष्ट्रातील सामना वर्तमानपत्राचे संपादक देखील आहेत. परवा त्यांचे फ्लॅट आणि अलिबागमधील अर्धा एकर जमीन ईडीने जप्त केल्या आहेत. हा अन्याय आहे. आम्ही ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या लक्षात आणून दिली,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : “महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार, यातील एक पक्ष नाराज झाला, तर…”, मविआमधील नाराजीवर शरद पवारांचं वक्तव्य

“आम्ही आमचे दोन विषय पंतप्रधान मोदींच्या कानावर घातले आहेत. त्यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली नाही. मला आशा आहे की या विषयांवर ते गंभीरपणे विचार करतील आणि निर्णय घेतील,” असंही पवारांनी नमूद केलं.

Story img Loader